‘गीता प्रेस, गोरखपूर’चा शताब्दी उत्सव ऋषिकेश (उत्तराखंड) येथील गीता भवनमध्ये साजरा !

हिंदु जनजागृती समिती (देहली), सनातन संस्था (गोवा), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (गोवा) संस्थांचा कार्यक्रमात सहभाग

ऋषिकेश (उत्तराखंड) – विश्वातील सर्वांत मोठी धार्मिक ग्रंथांची प्रकाशन संस्था असलेल्या ‘गीता प्रेस, गोरखपूर’चा शताब्दी महोत्सव पार पडला. या निमित्ताने येथील भव्य गीता भवन येथे २२ ते २९ मार्च २०२३ या कालावधीमध्ये संगीतमय ‘रामचरितमानस’च्या पाठाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी विविध राज्यातून सहस्रो भाविक आले होते. या ७ दिवसांत विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्याचा परिचय करून देणारे कार्यक्रमही गीता भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नारदीय निकुंज (उत्तरप्रदेश), गायत्री वेद संस्थान (उत्तराखंड), हिंदु जनजागृती समिती (देहली), सनातन संस्था (गोवा) आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (गोवा) आदी संस्थांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचा लाभ प्रतिदिन प्रत्यक्ष १ सहस्र २०० भाविकांनी, तर ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून सहस्रो भाविकांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि वक्त्यांचा परिचय गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांनी केले.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

१. २४ मार्च या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनात्मक कार्याचा परिचय विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी उपस्थितांना ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून करून दिला.

२. प्रारंभी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी गीतेच्या १८ व्या अध्यायाचे पठण केल्यावर यू.ए.एस्.च्या माध्यमातून व्यक्तीच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावळीत काय परिणाम होतो, याचा अभ्यास सादर केला. त्यासह समस्त हिंदूंना पूजनीय असलेल्या गंगा नदीच्या पाण्याचा संशोधनात्मक अभ्यास आणि विश्लेषण या वेळी मांडण्यात आले. याबरोबरच हिंदूंना प्रिय असलेल्या देशी गोमातेच्या माध्यमातून वातावरणात अधिक सकारात्मक स्पंदने कशी पसरतात ? तसेच गायीच्या सान्निध्यामुळे वातावरणातील उष्णता कशी न्यून होते ? या संशोधनाचे विश्लेषणही या वेळी करण्यात आले.

३. शेवटी भारतीय कला, गायन, वादन, नृत्य यांमधील सात्त्विकता दर्शवणारी विविध संशोधनात्मक प्रयोगांची माहिती उपस्थितांना ‘स्लाईड शो’द्वारे सांगण्यात आली.

४. या प्रसंगी उपस्थित अनेक जिज्ञासूंनी ‘संशोधनात्मक विषय आवडला आणि आम्हाला कार्यात सहभागी व्हायचे आहे’, असे त्यांनी स्वत: सांगितले.

संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, ढवळी, फोंडा, गोवा.