विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

हिंदु जनजागृती समिती, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधाचा परिणाम

हासन (कर्नाटक) – येथील विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची कुप्रथा चालू होती. हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला विरोध केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी ‘कुराण पठण करू नये’, असा आदेश दिला होता. त्यानंतर यावर्षी ४ एप्रिल या दिवशी झालेल्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण झाले नाही.

अ. ‘४ एप्रिलला सकाळी रथोत्सवाच्या वेळी रथापुढे कुराण पठण करू नये. मेदुरू येथील काझींनी (मुसलमान पंथाच्या शास्त्राप्रमाणे निकाल देणार्‍या न्यायाधिशांनी) केवळ आदराचा स्वीकार करावा’, असे धर्मादाय विभागाच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशात सांगण्यात आले होते. आदेशानुसार काझींनी देवालयाच्या जवळ असलेल्या भिंतीजवळ थांबून चन्नकेशवाला वंदन करून प्रार्थना केली.

आ. देवालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. नारायण स्वामी म्हणाले, ‘‘काझींनी कुराण पठण करणार नसल्याचे आम्हाला लिहून दिले. चन्नकेशवाला वंदन केल्यानंतर काझींना सुरक्षा कर्मचार्‍यांनी सुरक्षितपणे वाहनात घालून पाठवले.’’

इ. काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने पंडितांना पाचारण करून याविषयी माहिती संग्रहित केली. पंडितांनी, ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.

ई. धर्मादाय विभागाच्या आयुक्तांनी संबंधित आदेश काढल्यावर रथोत्सवाच्या ठिकाणी ४०० पेक्षा अधिक पोलीस, निमलष्करी दलाचे सैनिक तैनात करण्यात आले होते.