‘कुणी आपले कौतुक केल्यावर त्यात न अडकता साधनेत पुढे जाण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?’, याविषयी सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी केलेले मार्गदर्शन !

‘सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यांच्याकडून ‘कुणी आपले कौतुक केल्यावर त्याकडे कसे पाहिले, म्हणजे साधनेसाठी लाभ होऊ शकतो ?’ आणि ‘कौतुकामध्ये न अडकता आपण साधनेत पुढे कसे जाऊ शकतो ?’, या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. सुप्रिया माथूर
सौ. समिधा पालशेतकर

१. ‘कुणी आपले कौतुक केले, म्हणजे अहं वाढतो’, हा अपसमज आहे !

सौ. सुप्रियाताई म्हणाली, ‘‘गुण ही ईश्वरी देणगी आहे. त्यामुळे त्या संदर्भातील अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे किंवा चांगले प्रयत्न लिहून दिल्यास अन्य साधकांना प्रयत्न करणे सोपे जाते. बर्‍याच वेळा साधकांच्या मनात भीती असते की, मी लिहून दिले, तर माझा अहं वाढेल. ‘कुणी आपले कौतुक केले, म्हणजे आपला अहं वाढतो’, हा अपसमज आहे.

२. आपले कौतुक स्वकर्तृत्वाच्या विचाराने ऐकल्याने होणारे परिणाम

‘आपले कुठे चुकते ?’, आपण आपले कौतुक स्वकर्तृत्वाच्या विचाराने ऐकतो आणि मनोराज्यात रमून ‘मी कसा चांगले करतो !’, याचा विचार करत रहातो. त्यामुळे आत्मकेंद्रित कोष निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणजे कुणी आपल्याला काही शिकवणे, म्हणजे न्यूनता वाटते. अशा स्थितीमध्ये कुणी आपल्याला चूक सांगितली, तर राग येतो आणि मन निराश होते. या चक्रामध्ये अडकून आपण साधनेपासून दूर जातो. प्रयत्नांची दिशा योग्य नसल्यामुळे ‘आपले चांगले चालले आहे’, या भ्रमात राहून साधनेतील अनेक वर्षे वाया जातात.

३. कृतीच्या स्तरावर कसे प्रयत्न करावेत ?

कौतुक केल्यावर ‘आपल्याकडे देवाला देण्यासाठी काय आहे, तसेच गुरूंना काय आवडते ?’, याचे रहस्य उलगडत असते. ‘आपल्यातील गुरूंना आवडलेला गुण आपण आणखी कसा समर्पित करू शकतो ? तो कसा वृद्धींगत करू शकतो ?’, या संदर्भातील प्रयत्न तळमळीने करत राहिले की, ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण जलद गतीने होते. आपण समोरच्याला ‘हे देवामुळे किंवा गुरूंमुळे झाले’, असे सहजपणे सांगू शकतो. त्यामुळे त्याचे कर्तेपण आपल्याकडे रहात नाही.

४. वैचारिक स्तरावर प्रयत्न कसे करावेत ?

अ. आपल्यामध्ये असलेल्या गुणामुळे जेव्हा समोरचा साधक आपले कौतुक करतो, तेव्हा स्वतःला स्वतःची क्षमता ठाऊक असते. तेथे स्वतःकडे वस्तूनिष्ठपणे बघता यायला पाहिजे.

आ. ‘आपण जे काही प्रयत्न करत आहोत; तसेच आपल्यात जे काही गुण आहेत, ती देवाचीच देणगी आहे. ती त्याचीच कृपा आहे’, हे लक्षात ठेवावे.

इ. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘स्वतःमधील स्वभावदोष किंवा अहं घालवण्यास आपण असमर्थ आहोत’, याची जाणीव मनाला असली, तर आपल्यातील अहं न वाढता आपण सहजावस्थेत राहू शकतो.

प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या एका भजनामध्ये म्हटले आहे,

धन मी तुजला जरी अर्पियले । कोण दयेने प्राप्त ते झाले ।।
अजूनही मजला का न उमगले । कसे तुजला अर्पण करू ।।
तुझी कशी सेवा करू । नाथा तुझी कशी सेवा करू ।।’’

‘हे गुरुमाऊली, हे सर्व मला शिकायला मिळाले आणि आपणच माझ्याकडून हे लिहून घेतले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. समिधा संजय पालशेतकर, पनवेल