लैंगिक अत्याचारापासून  विदेशी पर्यटकाचे रक्षण करणार्‍या व्यक्तीचा सन्मान होणार !

परदेशी महिलेला लैंगिक अत्याचारांपासून वाचविणारे जखमी अवस्थेतील युरिको डायस यांचा सन्मान करतांना पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – नेदरलँडस्थित एका पर्यटकावर लैंगिक अत्याचार होण्यापासून रोखणारे युरिको डायस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘शौर्य’ पुरस्कारासाठी युरिको डायस यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. युरिको डायस हे आश्वे, पेडणे येथे एका रिसॉर्टमध्ये ‘बार अटेंडंट’ म्हणून काम करतात.

३० मार्च या दिवशी विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याच्या ठिकाणी धाडस करून जाऊन त्यांनी संबंधित महिलेची सुटका केली. या वेळी संशयित तथा पीडित महिला वास्तव्यास असलेल्या रिसॉर्टमधील कर्मचारी अभिषेक वर्मा यांनी युरिको डायस यांच्यावर सुर्‍याने मागून अनेक वेळा वार केले. आराडाओरड केल्यावर स्थानिक लोक युरिको डायस यांच्या साहाय्याला आले आणि त्यांनी त्यांना वाचवले. युरिको डायस यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार जीत आरोलकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ३१ मार्च या दिवशी युरिको डायस यांच्या प्रकृतीची चौकशी केली.