अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महाद्वार चंद्रपूर येथील सागवान काष्ठापासून साकार होणार !

मुंबई – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या महाद्वारात स्वतःचे अस्तित्व ठेवण्याचे भाग्य महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे. केवळ महाद्वार नाही, तर गर्भगृह आणि श्रीराम मंदिरातील अन्य द्वारेही चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठपासून साकारली जाणार आहेत. २९ मार्च या दिवशी विधीवत् पूजन करून हे काष्ठ अयोध्येसाठी पाठवण्यात येणार आहे. घराघरांतून या काष्ठावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

‘श्रीरामाचे मंदिर १ सहस्र वर्ष उभे रहावे’, या संकल्पाने मंदिर उभारण्यात येणार आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथील ‘फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूट’ने चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष श्री. नृपेंद्र मिश्र यांना कळवल्यावर ‘लार्सन अँड टुब्रो’, ‘टी.सी.ई.’ या प्रसिद्ध आस्थापनांच्या अभियंत्यांनी या काष्ठाची चाचणी केली. यामध्ये हे देशातील सर्वाेत्तम काष्ठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर मंदिर निर्माण समितीने सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून चंद्रपूर येथील काष्ठाची मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये व्यक्तीश: लक्ष घालून सर्वाेत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. सागवान काष्ठ उपलब्ध करून देत असल्याविषयी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

गुढ्या-तोरणे उभारून निघणार शोभायात्रा !

२९ मार्च या दिवशी दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर येथे काष्ठपूजन आणि आरती करून दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. येथे आशियात सर्वांत मोठा घेर असलेल्या राम आणि लक्ष्मण नावाच्या प्राचीन वृक्षांचे पूजन करण्यात येईल. शोभायात्रेचा समारोप ६ वाजता होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर येथील महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा चालू होणार असून तिचा समारोप रात्री ९ वाजता होईल. शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. रणवाद्य, योग, मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके असे एकूण ४३ लोककलांचे सादरीकरण या वेळी करण्यात येणार आहे.

यामध्ये १ सहस्र स्थानिक कलाकारांसह महाराष्ट्रभरातून १ सहस्र १०० कलाकार सहभागी होणार आहेत. शोभायात्रेचा मार्ग रांगोळीने सजवण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुढ्या-तोरण उभारण्यात येणार आहेत. या वेळी काष्ठांवर घराघरांतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

संत आणि रामायण मालिकेतील कलाकार यांचा सहभाग !

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणारे कलाकारही शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. योगऋषी रामदेवबाबा, सद्गुरु जग्गी वासुदेव आणि श्री श्री रविशंकर यांनाही शोभायात्रेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व खासदार, आमदार, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी भव्य काष्ठपूजन सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

१० सहस्र रामजपाचा संकल्प !

या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीरामाचा १० सहस्र जप लिहिण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील घरोघरी श्रीरामाचा जप लिहिण्यासाठी वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

श्रीराम ही सेवा करवून घेत आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणार्‍या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनर्उभारणीत अनेकांचे हात लागले आहेत. यामध्ये प्रत्येकाने स्वत:चा खारीचा वाटा उचलला आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडून श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे. काष्ठपूजनात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षीदार व्हावे.