पी.टी.आय.च्या भारतीय पत्रकाराला खलिस्तान्यांकडून मारहाण

वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन

खलिस्तानी समर्थक भारतीय पत्रकाराला शिवीगाळ करतांना

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानवाद्यांकडून करण्यात येणार्‍या आंदोलनाचे वार्तांकन करणारे ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे (पी.टी.आय.चे) पत्रकार ललित झा यांना खलिस्तान्यांनी मारहाण केल्याची माहिती झा यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात २ खलिस्तानी समर्थक त्याला शिवीगाळ करतांना दिसत आहेत.

झा यांनी सांगितले, ‘खलिस्तान समर्थकांनी माझ्या डाव्या कानावर २ काठ्या मारल्या. या घटनेने मला अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ च्या आतंकवादी आक्रमणाची आठवण झाली. मी घाबरून पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने पळालो.’ ट्वीटमध्ये त्यांनी  पोलिसांचे आभार मानले आणि ‘तुम्ही मला वाचवले, अन्यथा मी रुग्णालयामधून हा संदेश लिहिला असता’, असे म्हटले आहे. झा यांनी आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले की, वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तानी आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वरिष्ठांशी झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ आम्ही पाहिला आहे. पत्रकाराला आधी शिवीगाळ आणि नंतर मारहाण केल्याचे आम्हाला समजले. त्यांच्या सुरक्षेसाठी  कायद्याची कार्यवाही करणार्‍या यंत्रणेला दूरभाष करावा लागला. पत्रकारावर झालेल्या आक्रमणाचा आम्ही निषेध करतो. अशा कारवाया या तथाकथित खलिस्तानी समर्थकांची हिंसक आणि समाजविरोधी मानसिकता दर्शवतात, जे नियमितपणे हिंसाचार आणि तोडफोड करतात.

संपादकीय भूमिका

स्वतःला महासत्ता समजणार्‍या अमेरिकेमध्ये मूठभर खलिस्तानी भारताच्या दूतावासाबाहेर येऊन निदर्शने करतात, पत्रकाराला मारहाण करतात, हे अमेरिकेला लज्जास्पद ! अमेरिकेच्या पत्रकाराला भारतात कुणी मारहाण केली असती, तर अमेरिकेने आकांडतांडव केला असता !

(म्हणे) ‘तुम्ही अल्पसंख्यांकांना मारता !’ – खलिस्तानी

खलिस्तानी आंदोलकांनी आंदोलनाच्या वेळी भारतीय राजदूत तरनतारण सिंह संधू यांच्यावर टीका केली. खलिस्तानी म्हणाले, ‘‘हा संदेश भारत सरकार आणि त्यांचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्यासाठी आहे, जे मुक्त जगामध्ये आंतकवादी मुत्सद्देगिरीचा चेहरा आहेत. आम्ही त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, तुम्ही अल्पसंख्यांकांना मारता, ख्रिस्ती महिलांवर बलात्कार करता आणि निरपराध शीख, मुसलमान, तसेच नागालँडच्या लोकांना मारता अन् मग इथे येऊन तुम्ही ‘आम्ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहोत’, असे म्हणता. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हा दांभिकपणा संपवण्याची वेळ आली आहे.’’

संपादकीय भूमिका

याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ जर भारतातील बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकांना मारले असते, तर भारतात अल्पसंख्य राहिले नसते; मात्र देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य असून तेथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इतकेच नव्हे, तर जेथे हिंदू बहुसंख्य आहेत तेथेही हिंदूंना मार खावा लागत आहे !

सॅनफ्रान्सिस्को येथील वाणिज्य दूतावासाबाहेर भारतीय नागरिकांची शांतीफेरी !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – गेल्या आठवड्यात येथील भारतीर वाणिज्य दूतावासावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या घटनेनंतर २६ मार्च या दिवशी येथील भारतीय नागरिकांनी दूतावासासमोर एकत्रित येऊन शांतीफेरी काढली. या वेळी त्यांनी भारतीय राष्ट्रध्वजही फडकावला.