सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

सोलापूर – शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. दंड भरण्यासाठी १५ दिवसांची समयमर्यादा महापालिका प्रशासनाने दिली आहे. वृक्षतोडीची ही घटना फेब्रुवारीमध्ये घडली होती. त्या वेळी जाधव यांच्याकडे नेहरूनगरच्या मैदानाचे अतिरिक्त दायित्व देण्यात आले होते. त्यामुळे बेकायदा झाडे तोडल्याविषयीचे दायित्व जिल्हा क्रीडा कार्यालयाने जाधव यांच्यावर निश्‍चित केले. त्यानंतर दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिकेने काढले आहेत.

मैदानातील तोडलेली झाडे चांगल्या स्थितीत होती. कुणाचीही अनुमती न घेता ती तोडण्यात आली, तसेच त्या झाडांच्या लाकडाची परस्पर विक्री करण्यात आली, अशी तक्रार काँग्रेसचे सरचिटणीस अधिवक्ता मनिष गडदे यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने सत्तेन जाधव यांना नोटीस दिली होती.