पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघीण आणि तिचे ३ बछडे ‘नाईट व्हिजन कॅमेर्यां’मध्ये चित्रित झालेल्या चित्रीकरणात दिसत असल्याची माहिती प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्यात ८ दिवसांपूर्वी वाघाचे अस्तित्व असल्याचे स्थानिकांनाही निदर्शनास आले आहे. अंजुना धरण आणि चोर्ला घाट या ठिकाणीही रात्रीच्या वेळी ट्रकचालकांना वाघ दृष्टीस पडला आहे. काही स्थानिकांना वाघ गोव्याच्या सीमेतून कर्नाटकच्या भागात जात असतांना, तर कधी महाराष्ट्राच्या भागात जातांना दृष्टीस पडला आहे. याचे पुरावे सापडल्याने म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तिव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. म्हादई अभयारण्याजवळील कर्नाटकमधील भीमगड अभयारण्य आणि काळी व्याघ्र संरक्षित क्षेत्र याठिकाणीही वाघाचे अस्तित्व आहे. प्राणीशास्त्राचे अभ्यासक तथा संशोधक गिरीश पंजाबी यांनी हल्लीच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये गोव्यात ५ वाघांचे अस्तित्व असल्याचे म्हटले आहे.’’