पृथ्‍वी टिकवण्‍यासाठी पर्यावरणरक्षण आणि हवामान पालट हा नागरिकांचा जिव्‍हाळ्‍याचा विषय होणे आवश्‍यक !

अझरबैजान येथे चालू असलेल्‍या (११ ते २२ नोव्‍हेंबर २०२४ या कालावधीत) ‘जागतिक हवामान परिषदे (सीओपी २९ परिषदे)’च्‍या संदर्भातील वृत्त बघण्‍यात आले. खरेतर ‘पृथ्‍वीचे तापमानवाढ’ हा विषय जगभरातील सर्व राष्‍ट्रांच्‍या प्राधान्‍य क्रमावर आणि नागरिकांच्‍या जिव्‍हाळ्‍याचा विषय असायला हवा; परंतु या संदर्भातही जगाची वाटणी श्रीमंत जग विरुद्ध गरीब जग, अशी झालेली मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उद्या पृथ्‍वीच्‍या तापमान वाढीमुळे वा हवामान पालटामुळे संपूर्ण जगात ज्‍या काही नैसर्गिक आपत्ती ओढवतील, त्‍यामध्‍ये निसर्ग हा उत्तर वा दक्षिण जग अशी विभागणी करणार नाही किंवा त्‍याची किंमत केवळ अविकसित आणि अर्धविकसित देशांनाच मोजावी लागणार, असे नाही. आज युरोप, अमेरिका आणि मध्‍य आशिया हे हवामान पालटामुळे वर्षभरामध्‍ये होणार्‍या नैसर्गिक आपत्तींना मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहेत. 

१. अमेरिकेसह युरोपियन राष्‍ट्रांची जागतिक तापमानवाढ रोखण्‍यासाठी उदासीनता

काही मासांपूर्वी फ्रान्‍स, इटली या देशांत निर्माण झालेली पूरस्‍थिती त्‍यासह मागील मासातच स्‍पेनमध्‍ये टूरिया नदीला आलेल्‍या महापुरामुळे शेकडो जीव मृत्‍यूमुखी पडले, तर कोट्यवधी डॉलर्सची हानी झाली. त्‍यानंतरही पर्यावरण आणि तापमानवाढ यासंदर्भात ही राष्‍ट्रे गांभीर्याने विचार करतांना दिसून येत नाहीत. अमेरिकेत निवडून आलेल्‍या नवीन राष्‍ट्राध्‍यक्षांना तर ‘ग्‍लोबल वार्मिंग’ (जागतिक तापमानवाढ) असे काही असते, हेच मुळी मान्‍य नाही. त्‍यामुळे यापुढे अमेरिकेचा ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’संदर्भात आणि अमेरिकेच्‍या मागे  धावणार्‍या इतर युरोपीय राष्‍ट्रांचा दृष्‍टीकोन काय असेल, हे समजून येते. अझरबैजान येथील परिषदेला प्रदूषण करणार्‍या प्रमुख १३ देशांनीच अनुपस्‍थित रहाणे, म्‍हणजे परिषदेला उधळून लावण्‍यासारखेच आहे. मागील परिषदेमध्‍ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वर्ष २०३० पर्यंत ११ टेरावॅटपर्यंत नेण्‍याचे उद्दिष्‍ट ठरवले होते; परंतु मागील वर्षामध्‍ये या संदर्भात कुठल्‍याही देशाने कोणतीही कार्यवाही न करणे, हे परिषदेच्‍या उद्दिष्‍टांना काळे फासण्‍यासारखे आहे.

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

२. पर्यावरणाविषयी जागृती नसणे हेच आश्‍चर्यकारक !

जगभरातील नागरिकांमध्‍येही जागतिक हवामान पालटाच्‍या संदर्भात पुष्‍कळ मोठ्या प्रमाणावर जाणीव निर्माण झाल्‍याचे दिसत नाही. युरोपमधील काही देश सोडले, तर सर्व राष्‍ट्रांमध्‍ये आनंदी आनंदच आहे. भारतामध्‍ये बघितले, तर मुंबईसारखे जागतिक शहर असलेल्‍या महाराष्‍ट्रासारख्‍या पुढारलेल्‍या राज्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या निवडणूक काळात पर्यावरण हा मुद्दाच नाही. याउलट कुठला पक्ष किती आणि काय विनामूल्‍य देणार, याचीच रेलचेल आहे अन् मतदारसुद्धा याच फुकटच्‍या गोष्‍टींकडे डोळे लावून बसलेले आहेत, हे मोठे आश्‍चर्य !

३. पर्यावरण रक्षण आणि हवामान पालट यांविषयी नागरिकांनी स्‍वतःहून पुढाकार घेणे महत्त्वाचे !

जागतिक हवामान परिषदेमध्‍ये पर्यावरणवादी संस्‍था आणि कार्यकर्ते यांना किती प्रमाणात सामील करून घेतले जाईल अन् त्‍यांचा आवाज किती ऐकला जाईल, याविषयीही मोठा प्रश्‍नच आहे. या परिषदेमध्‍ये पृथ्‍वीचे तापमान कमी करण्‍यासाठी जे काही निर्णय घेतले जातील, याविषयी जगाला प्रदूषित करणार्‍या आणि मोठ्या प्रमाणावर कर्ब उत्‍सर्जन करणार्‍या मोठ्या देशांना अन् आस्‍थापनांना कायद्याने कुठलीच बांधिलकी आणली जाणार नाही. त्‍यांच्‍या स्‍वयंप्रज्ञेने ते जो काही निधी देतील, त्‍यावर अविकसित देशांना भरपाई मिळून पुढील कामकाज चालणार. त्‍यामुळे पर्यावरण रक्षण आणि हवामान पालट हा जगभरातील नागरिकांनी आपल्‍या जिव्‍हाळ्‍याचा अन् जीवनशैलीचा विषय केला, तरच पुढे सृष्‍टीचा टिकाव लागेल.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (१७.११.२०२४)