१. पृथ्वीमातेची झालेली विदारक स्थिती !
प्रत्येक वेळी जेव्हा एखादा प्रदेश मुसळधार पाऊस आणि पूर यांमुळे त्रस्त होतो, तेव्हा ते पृथ्वीमातेच्या अनियंत्रित रडण्याचे प्रतीक असते. प्रत्येक वेळी जेव्हा सूर्य क्रूर उष्णतेने प्रज्वलित होतो आणि उंच, भव्य झाडांचा (जंगलातील आग) सामूहिक-अंत्यसंस्कार चालू करतो, तेव्हा ते पृथ्वीमातेच्या चितेच्या अंत्यविधीच्या ज्वालांप्रमाणे भासते. प्रत्येक वेळी ‘क्लियर एअर टर्ब्युलन्स’ (हवामान पालट) वारंवार होत असल्याने विमान आकाशात मोठ्या प्रमाणात थरथरत असते, तेव्हा ते पृथ्वीमातेच्या थरथरण्याचे प्रतीक असल्याचे वाटते. पृथ्वीवर रहाणार्या रानटी लोकांकडून तिच्यावर भविष्यातील वाईट विचार सोडले जात आहेत.
२. मानवाने नेत्रदीपक यश मिळवून आणलेल्या अणूयुगाचे पृथ्वीमातेवर होणारे दुष्परिणाम !
अत्याधुनिक तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशांच्या नेतृत्वाखाली निसर्गाची ही लूट पुष्कळ पूर्वीपासून चालू झाली होती. कालांतराने लूटमारीचा वेग वाढला आणि इतर सर्वांनी त्यात हातभार लावला. जुलै १९४५ मध्ये जेव्हा न्यू मेक्सिकोमध्ये भूमीपासून ३५ सहस्र फूट उंचीवर आकाशात धुराचे दाट ढग पसरले, तेव्हा त्यानंतर आलेल्या अंधुक चकाकीचा निर्मात्यांना पुष्कळ अभिमान वाटला. किती मोठा टप्पा गाठला; परंतु नेत्रदीपक दिसणारी राख उभी पिके, प्राचीन जलाशये, शेजारची घरे, आश्चर्यचकित झालेले मानव आणि अज्ञानी गुरे यांच्यावर अनेक दिवस एकत्र पडत होती. एक नवीन युग आले होते ते म्हणजे अणूयुग ! हा मानवजातीसाठीचा अभूतपूर्व विजयच होय !
३. प्लास्टिक आणि पॉलिमर यांच्यामुळे प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली प्लास्टिक कचर्याची समस्या !
प्लास्टिक आणि पॉलिमरचा शोध वर्ष १९०७ च्या आसपास लावला गेला असला, तरी मानवी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये या सामग्रीने हळूहळू घुसखोरी केली. वर्ष १९५० च्या सुमारास या जादूच्या सामग्रीवर मानव अवलंबून रहाण्यापर्यंत अपरिवर्तनीय वाढ झाली. स्वयंपाकघरातील वस्तूंपासून ते संगणकांपर्यंत, पिशव्यांपर्यंत, मोटारगाड्यांपासून ते विमानांपर्यंत, खेळण्यांपासून ते यंत्रमानवांपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचा वापर होत आहे. त्यामुळे संशोधकांनी प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या प्लास्टिक कचर्याच्या भयावह परिणामांशी झुंज देत असलेल्या जगाची कल्पनाच केली नसेल.
वर्ष २०४० पर्यंत प्लास्टिक कचर्याचे प्रमाण १.३ अब्ज टन इतके निश्चित करण्यात आले आहे. भूमी आणि महासागर यांमध्ये त्याचे अस्तित्व लक्षात घेता त्याची विल्हेवाट लावणे, पुनर्नवीकरण करणे किंवा केवळ सहन करणे इतकेच शेष आहे. यातील बहुतांश कचरा कधीही नाहीसा होणार नाही. कालांतराने विघटित आणि तुटून पडलेले हे कचर्याचे तुकडे केवळ हानी अन् आजारपण यांच्यासाठी जिवंत प्रणालींमध्ये प्रवेश करतील. तथापि या साहित्याची सोय, अष्टपैलूता आणि परवडण्याजोगी क्षमता, त्याच्या व्यावसायिक आकर्षणाला चालना देत राहील आणि त्याच्या अंदाधुंद वापराच्या सर्व धोकादायक परिणामांना मागे टाकेल. निसर्गाचा विध्वंस चालूच राहील.
४. भ्रमणभाषच्या शोधाने पृथ्वीवर झालेल्या झगमगाटाची दुसरी काळी बाजू म्हणजे निसर्गाचा होणारा विध्वंस !
पृथ्वीला हादरवणारा दुसरा शोध हा भ्रमणभाषचा होता. वर्ष १९८० च्या सुमारास मोठ्या संख्येने टोळांसारख्या क्षितिजावर दिसणार्या या उपकरणाने मानवी जीवनावरील आक्रमक नियंत्रणासाठी प्लास्टिक आणि पॉलिमर यांना साहाय्य केले आहे. जगभरातील वास्तविक वेळ संप्रेषणे (एकाच वेळी अनेक जण एकमेकांशी संपर्क करू शकतात) एका बटणाच्या ‘क्लिक’वर आहेत. यात काही न्यून करणे किंवा तडजोड करणे पुष्कळ प्रतिगामी ठरेल. उपकरणाच्या मालकीचा आग्रह एखाद्या व्यक्तीची स्थिती, वय, धर्म आणि संस्कृती यांवर अवलंबून असतो. ‘वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मंचा’च्या म्हणण्यानुसार, वर्ष २०२२ मध्ये अंदाजे ५.३ अब्ज भ्रमणभाष उपकरणे कचरापेटीत पाठवली गेली. यामुळे ‘ई-कचरा’ समस्येची तीव्रता वाढली; परंतु ही माहिती या उपकरणांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याविषयी आहे.
दुसरीकडे त्यांच्या उत्पादनासाठी इंधनावर भर देणार्या तंत्राचा वापर करून उत्खनन केलेल्या मौल्यवान धातूंच्या नियमित पुरवठ्याची आवश्यकता असते. खाण प्रक्रियेचा अंतर्गत भाग म्हणजे खाणींमुळे झालेली परिसंस्थेची न भरून येण्याजोगी हानी, जंगलांचे मोठ्या प्रमाणात निर्मूलन आणि समुदायांचे बळजोरीने विस्थापन ! या उद्योगाची ही काळी बाजू त्याचा चमकदार प्रस्ताव देण्याच्या झगमगाटात हरवली आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात नफा दाराशी आलेला असतो, तेव्हा पर्यावरणावर लक्ष ठेवणार्या यंत्रणेला अडवणे सोपे जाते. त्यामुळेही निसर्गाचा विध्वंस चालूच आहे.
५. पृथ्वीमातेच्या विध्वंसाला कारणीभूत असणारा तिसरा राक्षस म्हणजे इलेक्ट्रिक वाहने (विजेवर चालणारी वाहने) !
निसर्गातील वरील विध्वंस पुरेसे नाहीत; म्हणून जणू काही क्षितिजावर नवीन राक्षस स्वतःचे डोके वर उचलत आहे. या राक्षसामध्ये अधिक चातुर्य आणि विध्वंसक क्षमता आहे. हा राक्षस म्हणजे ‘स्वच्छ हवेसह इलेक्ट्रिकल व्हेईकल्स’ ! हे एक फसवे वचन आहे. ‘द कोॲलिशन ऑफ कन्सर्न्ड मॅन्युफॅक्चरर्स अँड बिझनेसेस ऑफ कॅनडा’ (‘सी.सी.एम्.बी.सी.’) आम्हाला सांगते की, २५० टन मातीचे उत्खनन करावे लागेल, ज्यामध्ये लिथियमसाठी १२ टन खडक, ५ टन कोबाल्ट खनिजे, निकेलसाठी ३ टन खनिज आणि १२ टन तांबे धातू यांचा समावेश आहे. हे कशाला, तर शेवटी ‘शून्य उत्सर्जन’ वाहन मिळवण्यासाठी !
जर आपण पुरवठा साखळीतील इतर सर्व उपकरणांच्या ऊर्जेच्या गरजांवर प्रकाश टाकला, तर खाणकाम आणि माती हलवण्याच्या क्रियाकलापांचा मुख्य आधार, मोठ्या चाकांचे लोडर, प्रचंड प्रमाणात डिझेल (१२ घंट्यांना सुमारे १ सहस्र लिटर) वापरले जाते. आज जगात अंदाजे ७६० दशलक्ष चारचाकी आहेत. जर दीर्घकाळासाठी यांची जागा ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल्स’ (‘ईव्ही’) वाहनांनी (विजेवर चालणारी वाहने) उत्तरोत्तर पालटायची असेल, तर या आश्चर्यकारक स्वच्छ इलेक्ट्रिक वाहनांच्या खनिजविषयक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूमीचे विभाजन करावे लागेल. ते करतांना आपण जंगल आच्छादनाच्या नाशाकडे किती लक्ष देत आहोत ? जेथे ‘ईव्ही’ वाहने चालतात, तिथे स्वच्छ हवा, तर दुसरीकडे खाणींमध्ये आणि खड्ड्यांमध्ये ई. व्ही. वाहन घडवण्यासाठी स्वतःला विघटित करणारा कोळसा, अस्वच्छता आणि इतर कायमस्वरूपी होणारी हानी ! ही लूट अशाच प्रकारे चालू आहे.
६. जागतिकीकरण आणि व्यापारीकरण यांच्या युगात निर्माण झालेल्या विनाशकारी उत्पादनांमुळे गुदमरून गेलेली पृथ्वीमाता !
अशा प्रकारे विविध शोध आणि संशोधन यांद्वारे प्रारंभी नियंत्रित पद्धतीने, काही श्रीमंतांच्या लाभासाठी आणि नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवून निसर्गाची लूट होते अन् ती तशीच होत रहाते. ती वस्तू सर्वांच्या कह्यात येते. या मार्गाचे स्पष्टपणे अनुसरण करणारे क्षेत्र म्हणजे वाहतूक क्षेत्र ! आज सर्वजण दूरच्या आणि जवळच्या प्रवासाचा आनंद अनुभवतात. देशांचे जागतिकीकरण आणि व्यापारीकरण होत असतांना, तसेच आपल्या शहरांचा आकार वाढत असतांना लोकचळवळींची वारंवारता अन् व्याप्ती वरच्या दिशेने वाढत जाते. अर्थव्यवस्था उंचावते, वैयक्तिक संपत्ती वाढते आणि औद्योगिक क्रियाकलाप नवीन भूक शांत करतात.
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. हा समृद्धीचा दृश्यमान चेहरा आहे. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, स्मशानभूमीच्या विनाशकारी उपउत्पादनांच्या दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे.
६ अ. पर्यावरणीय र्हासासाठी अनेक देश कारणीभूत ! : प्रारंभीच्या पर्यावरणीय र्हासासाठी पाश्चिमात्य देशांना ऐतिहासिकदृष्ट्या उत्तरदायी धरले जाऊ शकते; परंतु इतर देशही त्यांचे योगदान देण्यात मागे राहिले नाहीत. भारतात पर्यावरण संरक्षण कायद्यांची निकृष्ट कार्यवाही आणि त्यात केले जाणारे पालट यांचा मोठा फटका बसतो.
६ आ. अपेक्षित पर्यावरणीय संमती आणि वास्तव ! : पर्यावरण, वन आणि हवामान पालट यांविषयी मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार (२२ ऑगस्ट २०१३ या दिवशी दिलेली अधिसूचना) १०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या नव्याने बांधलेल्या रस्त्यांना पर्यावरणीय संमती असणे आवश्यक आहे. हिमालयाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशातून जाणार्या ९०० कि.मी. लांबीच्या मोठ्या रस्ते प्रकल्पांचे मोठ्या संख्येने संकुलांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यामुळे सर्व वैयक्तिक संकुलांची लांबी १०० किलोमीटरपेक्षा न्यून झाली आहे. त्यामुळे पूर्व पर्यावरणीय संमतीची आवश्यकता वगळण्यात आली आहे.
७. शहरीकरणामुळे होणारे भूमी आणि भूजल यांचे प्रदूषण थांबवा !
पश्चिमेकडील शुष्क थार वाळवंटापासून उत्तर भारताच्या सुपीक मैदानांचे रक्षण करणारी, पहारेकरी म्हणून उभी असलेली अरवली येथील पर्वतरांग अनधिकृत दगडी खाणकाम अन् बेकायदेशीर बांधकामांच्या प्रचंड बांधकामांद्वारे वेगाने सपाट केली जात आहे. याचा परिणाम म्हणजे हळूहळू देहलीचे वाळवंटातील धुळीच्या प्रदेशामध्ये रूपांतर होत आहे. नियामक प्राधिकरणांनी थकबाकीदार संस्थांना अनेक सूचना दिल्या असल्या, तरी हे चालूच आहे. जसजशी शहरे अधिकाधिक दाट होतात, तसतसे रोजगाराचे नवे शोधकर्ते शेजारच्या कचर्याचे ढिगारे निर्माण करतात. सर्व कचर्याला ही शहरे सामावून घेत आहेत. ही शहरे अधिक प्रमाणात विषारी पाणी सोडतात आणि माती अन् भूजल प्रदूषणाची शक्यता वाढवत आहेत. याला पूर्णविराम नाही !
८. व्यापारापेक्षा निसर्ग हवा !
भारतात ‘राष्ट्रीय हरित लवाद’ स्थापन झाला आहे. वर्ष २०१० मध्ये त्याच्या स्थापनेपासून आणि इतर वैधानिक संस्था निर्धारित लढाई पुकारण्यासाठी जाग्या होत आहेत. पृथ्वीमातेला वाचवण्याच्या आपल्या अविरत लढाईत संघर्ष करत असल्याचे आपण पहातो. अशा प्रकारच्या लढाईत विजयाची पूर्ण निश्चिती नाही. केवळ आशा करूया की, आपण जो पर्यावरणीय विनाशाचा धोकादायक मार्ग स्वीकारला आहे, तो विस्मृतीत गेलेल्या वाळूत हरवून जाईल. टाळ्या वाजवणे आणि खोटे वागणे यांची जाणीव होईल. जितक्या लवकर हे होईल तितके चांगले ! विचारशून्य ‘व्यापारा’ऐवजी ‘निसर्गा’ची निवड करण्याची वेळ आली आहे.
लेखक – श्रीमंत चटर्जी, वरिष्ठ सल्लागार, भारतीय व्यवस्थापन संस्था, विशाखापट्टणम्.