गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तगणांना प.पू. कानिफनाथ महाराज यांचे मार्गदर्शन
नाणीज (रत्नागिरी) – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण केलेला संकल्प, विचार पूर्णत्वाला जाणार आहे. म्हणूनच हिंदु धर्माचे संस्कार, परंपरा, विचारधारा आणि आदर्श असाच पुढे वाढवत ठेवू. सर्वांना प्रेम, चांगली वागणूक देऊन प्रत्येकाचा आदर बाळगूया, असा उपदेश प.पू. कानिफनाथ महाराज यांनी भक्तगणांना दिला.
गुढीपाडव्याच्या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने राज्यातील जिल्ह्यांच्या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यानंतर राज्यभरातील भक्तगणांना एकाच वेळी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन प.पू. कानिफनाथ महाराज यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते.
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देवून कानिफनाथ महाराज पुढे म्हणाले की,
१. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आपल्याला नेहमी संदेश देतात, ‘तुम्ही जगा, दुसर्याला जगवा.’ यामध्ये माणसाने माणसासारखे जगले पाहिजे. माणुसकीने जगावे. हाच विश्वाचा धर्म आहे. त्याचसमवेत आपल्या अवतीभोवतीचा निसर्गही जगवला पाहिजे.
२. आज जगामध्ये सर्वत्र अशांतता आहे; कारण आज माणूस माणसासारखा वागतांना दिसत नाही. आम्ही एकमेकांचे जातीमध्ये, धर्मामध्ये खच्चीकरण करत आहोत. आपणच कसे श्रेष्ठ आहोत ? असेच प्रत्येकाला वाटत असते.
३. हिंदु ही उदार, विशाल हृदयाची संस्कृती आहे. आम्ही आमच्या महापुरुषांचा, देवीदेवतांचा आदर करतो. आमच्या धर्मासमवेत प्रत्येक धर्माचा आदर करतो.
४. नवीन वर्षांत शांतता, आनंद, बंधुभाव, सकारात्मता वाढीला लागावी. हिंदु धर्मात ‘वसुधैव कुटुम्बकम्’ही संकल्पना महत्त्वाची आहे. ज्याच्यामध्ये आपण सर्व परिवाराचा विचार करतो. त्याला समजून घेतो. विश्व हे कुटुंब आहे, असे मानतो. ‘विश्वात शांतता लाभावी’, आनंद लाभावा, सकारात्मक विचार वाढिला लागावेत, अशी आज प्रार्थना करूया.
सौजन्य : Ratnagiri Khabardar