मधुमेह – उच्च रक्तदाबासाठी एकच औषधाला भारत सरकारचे ‘पेटंट’  

सावर्डे येथील फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. अश्विनी पाटील यांचे संशोधन

(पेटंट म्हणजे स्वामित्व हक्क)

प्रा. अश्विनी पाटील

चिपळूण – मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा रुग्णांची सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सावर्डे येथील ‘गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयातील प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध निर्माण केले आहे. या औषधाला भारत सरकारने ‘पेटंट’ बहाल केले आहे. औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणार आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर चांगले आरोग्य लाभावे; म्हणून या दिवशी कडुलिंबाचा प्रसाद घेतला जातो. याच कडुलिंबाच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठीचे औषधाचे ‘पेटंट’ लाभदायक ठरणार आहे.

याविषयी प्रा. अश्विनी पाटील यांनी सांगितले की,

१. बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स’ या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.

२. हे संशोधन मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.

३. अनेक औषधे रक्तात जात नाहीत, तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम दिसत नाही. याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला असून त्यावर उपाय म्हणून हे औषध सिद्ध करतांना ‘नॅचरल पॉलिमर’चा वापर करण्यात आला आहे.

४. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचे ‘इमिजीएट रिलीज’, तसेच ‘मेटफॉरमीन’ नामक ‘ब्लडशुगर’ नियंत्रण करणार्‍या औषधाचे ‘सस्टेन रिलीज’ लेयर असणारी एक बायलेअर गोळी बनवण्यात आली असून तिच्या ‘ड्रग रिलीज’चा अभ्यास करण्यात आला.

५. आजपर्यंत अशा रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा दुष्परिणाम किडणीवरही होतो. साईडइफेक्ट्स वाढतात. याशिवाय दोन प्रकारची औषधे घेणे रुग्णांना खर्चिक पडते.

६. हे औषध बाजारात येण्यास अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत.