माहीम समुद्रातील मजारीभोवतीचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले !

राज ठाकरे यांच्या चेतावरणीचा परिणाम !

मुंबई – राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर माहीम येथील समुद्रातील मजारीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम २३ मार्च या दिवशी मुंबई महानगरपालिकेकडून पाडण्यात आले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावरील मनसेच्या सार्वजनिक सभेत राज ठाकरे यांनी मजारीभोवतीचे अनधिकृत बांधकाम एका मासात हटवले नाही, तर मजारीच्या बाजूला गणपतीचे भव्य मंदिर बांधू, अशी चेतावणी दिली होती. यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने ही कारवाई केली.

राज ठाकरे यांनी मनसेच्या सभेत मजारीभोवती वाढत असलेल्या अवैध बांधकामाची छायाचित्रेही दाखवली. मागील २ वर्षांत मजारीभोवती दर्गा बांधण्याचे काम चालू आहे. माहीम येथील समुद्रातील मजारीभोवती दुसरे ‘हाजी अली’ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर मुंबई पोलिसांकडून रात्रीपासूनच या मजारीभोवती मोठ्या प्रमाणात पहारा ठेवण्यात आला. त्यानंतर २३ मार्च या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी सकाळी ७ वाजता माहीम समुद्राच्या ठिकाणी आले. सकाळीच मोठ्या पोलीस पहार्‍यामध्ये मजारीभोवती असलेले अवैध बांधकाम पाडण्यात आले.

संपादकीय भूमिका 

  • चेतावणीनंतर जागे झालेल्या प्रशासनाने आतापर्यंत या अनधिकृत बांधकामावर कारवाई का केली नाही ? संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !
  • प्रशासनाने राज्यातील अशी सर्वच अनधिकृत मजारे, दर्गे आणि मशिदी यांचा शोध घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे !