नवी देहली – न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत प्रतिदिन ५० ते ६० प्रकरणे ऐकतात. अनेकदा निर्णय राखून ठेवले जातात. त्यामुळे शनिवारी न्यायाधीश त्यांचे निर्णय लिहिण्यात व्यस्त असतात. ते रविवारीसुद्धा सोमवारच्या सुनावण्यांची सिद्धता करतात. न्यायाधीश वर्षातील २०० दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले, तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम, हेच सगळे विचार चालू असते. थोडाफार वेळ मिळतो, त्यातही ते त्यांच्या कामाचाच विचार करत असतात, अशी माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी येथे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये (परिषदमध्ये) बोलतांना दिली. न्यायालयातील प्रलंबित दावे आणि न्यायालयाला मिळणार्या सुट्या, यांविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यावर ते बोलत होते.
सरन्यायाधिशांनी यांनी मांडलेली सूत्रे
१. कोणतीही व्यवस्था पूर्ण नसते; परंतु आपल्याकडे सर्वांत उत्तम प्रणाली आहे. ‘कॉलेजियम’ (न्यायमूर्तींची नियुक्ती आणि स्थानांतर यांच्याशी संबंधित प्रणाली) प्रणालीमागचे मुख्य उद्दीष्ट ‘न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि सुरक्षित ठेवणे’, हे आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर तिला बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल.
२. मी २३ वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम करत आहे; परंतु एखाद्या प्रकरणात कोणता आणि कसा निर्णय घ्यायचा ? हे मला कुणी सांगितले नाही. सरकारकडून कधी कोणताही दबाव आला नाही.