काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

नवी देहली – आमचे (भाजपचे) सरकार आल्यापासून आम्ही या देशाला खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचा प्रयत्न केला. याआधी काँग्रेसने देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामी देश बनवले होते, असे विधान भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी येथे एका कार्यक्रमामध्ये केले. खासदार त्रिवेदी यांना हिंदु राष्ट्राच्या कल्पनेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना ते बोलत होते.

खासदार त्रिवेदी पुढे म्हणाले की,

१. मला जगातील एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा, जिथे शरीयत आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात मतभेद झाले, तर देशातील सत्ताधारी पक्ष संसदेत कायदा करून राज्यघटना पालटून शरीयतला सर्वोच्च न्यायालयालापेक्षा श्रेष्ठ ठरवतो ? असा एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा जिथे तिहेरी तलाक आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अस्तित्वात आहे ?

२. भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे जगातील सर्व धर्म नांदतात. पारशी धर्म त्याच्या उगमस्थानी संपला; पण भारतात तो अस्तित्वात आहे. आज या धर्मातील अनेक लोक उद्योगपती आहेत. ज्यू लोकांवर जगात सगळीकडे अत्याचार झाले; मात्र भारतात तसे झाले नाही. तरीही या हिंदु संस्कृतीला ‘धर्मांध’ म्हणून अपमानित केले जाते.

इस्लामी देशांत मशिदींमध्ये बाँबस्फोट होतात !

जगात भारत हाच एकमेव देश आहे, जिथे २० कोटी मुसलमान आहेत; पण मशिदीत बाँबस्फोट होत नाहीत; मात्र इस्लामी देशांमधील मशिदींमध्ये बाँबस्फोट होतात, असेही खासदार त्रिवेदी यांनी सांगितले.

हिंदू कुणालाही हिंदु धर्म स्वीकारण्यास बाध्य करत नाहीत !

कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. कुठल्या अन्य धर्माच्या कार्यक्रमात इतर धर्माचे लोक जातात का ? पण कुंभपर्वात सहभागी होणार्‍या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे, असे खासदार त्रिवेदी म्हणाले.