पणजी, १३ मार्च (वार्ता.) – केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (‘डी.पी.आर्.’ला) काही निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटींवर तांत्रिक संमती दिली आहे, अशी माहिती केंद्रशासनाने राज्यसभेत दिली आहे. राज्यसभेचे खासदार लुईझिन फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय राज्यमंत्री तुडू म्हणाले,
‘‘केंद्रीय जल आयोगाने कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अहवालाला ‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य स्थिती या आधारांवर संमती दिली आहे; मात्र यासाठी काही निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी म्हादईचे पाणी वळवलेले नाही. म्हादई जलतंटा लवादानुसार भंडुरा धरणासाठी २.१८ टी.एम्.सी. पाणी, तर कळसा धरणासाठी १.७२ टी.एम्.सी. पाणी देण्याचे अधिसूचित झाले आहे. म्हादई जलतंटा लवादाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी केंद्राने ‘म्हादई प्रवाह’ या नावाचे प्राधिकरण नव्याने स्थापन केले आहे.
हे पहा –
— Luizinho Faleiro (@luizinhofaleiro) January 3, 2023