पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

भारतीय समुदायाची सुरक्षा हे आमचे प्राधान्य असेल !  – ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे आश्‍वासन

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौर्‍यावर असलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतांना ऑस्ट्रेलियामध्ये हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचे सूत्र उपस्थित केले.

१. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील मंदिरांवरील आक्रमणांच्या बातम्या सारख्या येत आहेत. अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या. त्यांनी मला आश्‍वस्त केले आहे की, भारतीय समुदायाची सुरक्षा हे त्यांचे प्राधान्य आहे. या विषयावर दोन्ही देश नियमित संपर्कात रहातील आणि शक्य ते सर्व सहकार्य करतील.

२. पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, हिंद आणि प्रशांत क्षेत्रांतील समुद्री सुरक्षा  वाढवण्यावर आमची चर्चा झाली. आम्ही एक व्यापक आर्थिक करारावरही काम करत आहोत. संरक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आम्ही करार केलेले आहेत.