हिंदु धर्म सोडून मुसलमान आणि ख्रिस्ती बनलेल्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू नये ! – विश्‍व हिंदु परिषद

विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार

नोएडा (उत्तरप्रदेश) – देशात धर्मांतर केलेल्या लोकांना आरक्षण देण्याला असलेला विरोध आता जोर धरू लागला आहे. हिंदु धर्म सोडून इस्लाम आणि ख्रिस्ती बनलेल्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू नये, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने येथे केली. उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापिठात आयोजित केलेल्या एका परिसंवादात ही मागणी करण्यात आली. विश्‍व संवाद केंद्र, गौतम बुद्ध विद्यापीठ आणि हिंदु विश्‍व पत्रिका यांच्या वतीने ‘धर्मांतर आणि आरक्षण’ या विषयावर नुकतेच एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात धर्मांतरितांना दिल्या जाणार्‍या आरक्षणाविषयी विविध विभागांतील १५० लोकांनी त्यांची मते मांडली. यामध्ये माजी न्यायाधीश, विद्यापिठांचे कुलगुरू, प्राध्यापक, पत्रकार आणि अधिवक्ता यांचा समावेश होता. धर्म पालटणार्‍यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये, असे इतरही मान्यवरांचे म्हणणे  होते.

धर्मांतरित झालेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाच्या  सूत्रावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन् आयोगाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माध्यम शाखा असलेल्या विश्‍व संवाद केंद्राने बालकृष्णन् आयोगाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाविषयी योग्य निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी आयोगासमोर तथ्ये मांडण्यासाठी उचित पावले उचलली जातील, असे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले.