छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

उपस्थित धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी मार्गदर्शनाला उपस्थित धारकरी

कोल्हापूर, ३ मार्च (वार्ता.) – क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर मृत्यू येईपर्यंत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. प्रत्येक दिवशी एकेक अवयव कापण्यात आला. फाल्गुन अमावास्येला त्यांच्या देहाचे तुकडे करून त्यांना ठार मारण्यात आले. त्यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान केले. या बलीदानाच्या स्मरणार्थ ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते २ मार्चला ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास’ या विषयावर येथील व्याख्यानात बोलत होते.

पू. भिडेगुरुजी या प्रसंगी म्हणाले की,

१. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ लढवय्ये होते असे नाही, तर त्यांनी ४ मराठी, १ हिंदी, १ संस्कृत असे ६ ग्रंथ लिहिले. त्यांना संस्कृत, भाषा, इतिहास यांसह विविध विषय शिकवण्यासाठी शिवरायांनी कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांची नियुक्ती केली होती.

२. वेद म्हणजे हिंदूंचे सामर्थ्य, वैभव आहे. वेद म्हणजे निखळ सत्य होय. असा वारसा आपण जतन केला पाहिजे.

३. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे हिंदु धर्म, संस्कृती यांसाठीच जगले अन् लढले. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलो, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे त्यांचाच आदर्श समोर ठेवून आपल्याला ‘शिवाजी-संभाजी’ रक्तगटाचा जाज्वल्य धर्माभिमान असलेल्या तरुणांची आवश्यकता आहे.

४. ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केल्यावर काही राजकीय लोकप्रतिनिधी ‘नाव पालटण्याची आवश्यकता काय ?’, असे म्हणत आहेत, हे दुर्दैवी आहे.