‘इस्लामिक स्टेट’च्या ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा

वर्ष २०१७ मध्ये रेल्वेमध्ये बाँबस्फोट घडवल्याचे प्रकरण

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) लक्ष्मणपुरी येथील  विशेष न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये रेल्वेगाडीतील बाँबस्फोटांच्या प्रकरणी इस्लामिक स्टेटशी संबंधित महंमद फैसल, गौस महंमद खान, महंमद अझहर, आतिफ मुझफ्फर, महंमद दानिश, सय्यद मीर हुसेन आणि आसिफ इक्बाल उपाख्य रॉकी या ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा आणि त्यांच्या महंमद आतिफ उपाख्य ‘आतिफ इराकी’ या साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

एन्.आय.ए.च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आतंकवाद्यांनी उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी स्फोटके पेरण्याचा प्रयत्न केला होता. अन्वेषणात अशी अनेक छायाचित्रे सापडली, ज्यात आरोपी स्फोटक उपकरणे आणि दारूगोळा बनवतांना दिसत आहेत. समवेत ‘इस्लामिक स्टेट’चा झेंडा आहे. या गटाने विविध ठिकाणांहून अवैध शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली होती. आतिफ, दानिश, हुसेन आणि सैफुल्लाह यांनी ७ मार्च २०१७ या दिवशी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेगाडीत बाँबस्फोट घडवून आणला होता. यात १० जण घायाळ झाले.

अन्य एका प्रकरणात २ भावांना सश्रम कारावास

‘अन्य एका प्रकरणात ‘इस्लामिक स्टेट’च्या नावाने देशात आतंकवादी कारवाया करण्यासाठी कट्टरतावादी तरुणांची भरती केल्यावरून गुजरातमधील एन्.आय.ए.च्याच्या एका विशेष न्यायालयाने २ भावांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याने ‘एन्.आय.ए.च्या’ने नोंदवलेल्या प्रकरणांत दोषी ठरवण्याचे प्रमाण ९३.६९ टक्क्यांवर पोचले आहे’, अशी माहिती एन्.आय.ए.च्या एका अधिकार्‍याने दिली.