तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.

१. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये त्याची आक्रमणे अधिक तीव्र केली आहेत. यामागे तेथील सरकार उलथवून शरीयत लागू करण्याचा उद्देश आहे. ही संघटना त्यांच्या आतंकवाद्यांचे प्रशिक्षण आणि तैनाती यांसाठी पाक-अफगाण सीमेवरील दोन्ही बाजूंकडील आदिवासी भागांचा वापर करत आहे. टीटीपी वैचारिक मार्गदर्शन अल् कायदाकडून घेते. टीटीपी, बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत यांसह अन्य आतंकवादी संघटना अफगाणी सीमेवरील आदिवासी भागांचा लाभ घेत असतात.

२. अमेरिकेच्या या अहवालात पाकवर टीकाही करण्यात आली आहे. पाकने त्याच्या भूमीचा वापर कोणत्याही आतंकवादी संघटनेला करू देणार नाही, असे म्हटले होते; मात्र पाक त्यानुसार वागत नाही, असे या अहवालात म्हटले आहे.