२८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञानदिन’ झाला. त्या निमित्ताने…
धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परविरोधी संकल्पनेचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही आढळत नाही. आम्ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्या दृष्टीने धर्माचा एक अंग मानत होतो. भारतात कोणत्याही विद्यापिठाची पदवी घेतलेली नसतांनासुद्धा ज्ञानप्राप्त ऋषीमुनींनी आत्मसाक्षात्काराद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रकट केले आहेत. आमच्या येथे साक्षात् भगवंताच्या मुखातून निघालेल्या पवित्र भगवद़्गीतेच्या ७ व्या अध्यायाला ‘ज्ञान-विज्ञानयोग’ म्हटले आहे. या अध्यायात विज्ञानासहित ज्ञानाचा विषय आणि ईश्वराच्या व्यापकतेची चर्चा केली आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘प्राचीन भारतातील विज्ञान विविध क्षेत्रांत समृद्ध, वेदकाळापासून प्राचीन भारताचे प्रगत नौकाशास्त्र, रामायण आणि महाभारत यांचा काळ अन् नौका, तसेच वराहमिहिर आणि राजा भोज यांनी जहाज निर्मितीवर केलेले लिखाण’, यांविषयी आपण वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/657758.html
८. लोथल (गुजरात)मध्ये उत्खननात जहाज निर्मितीच्या कारखान्याचे पुरावे आढळणे
वर्ष १९५५ आणि १९६१ मध्ये गुजरातच्या ‘लोथल’मध्ये पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते. लोथल भले ही एकदम समुद्रकिनार्यावर वसलेले नाही; परंतु समुद्राची एक छोटी पट्टी लोथलपर्यंत आली आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननात हे समोर आले की, जवळजवळ साडेतीन सहस्र वर्षांपूर्वी लोथल एक वैभवशाली बंदर होते. या उत्खननातून प्राप्त अवशेषांमध्ये याहूनही अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट उजेडात आली की, लोथलमध्ये जहाज निर्मितीचा कारखाना होता. तेथून अरब देश आणि इजिप्त येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी उलाढाली होत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत.
९. राजा भोज याने ‘युक्तिकल्पतरू’ ग्रंथात जहाज निर्मितीचे ज्ञान केले लिपीबद्ध !
भारतावर इस्लामी आक्रमण आरंभ होण्याच्या कालखंडात, म्हणजे ११ व्या शतकात राजा भोज याने ज्ञान-विज्ञानाशी संबंधित अनेक ग्रंथ लिहिले किंवा विद्वानांकडून लिहून घेतले. या ग्रंथांपैकी एक प्रमुख ग्रंथ आहे ‘युक्तिकल्पतरू’ ! हा ग्रंथ जहाज निर्मितीसंबंधी आहे. लहान प्रवास आणि लांबवरच्या प्रवासासाठी लहान अन् मोठ्या, वेगवेगळ्या क्षमता असलेल्या जहाजांची निर्मिती कशी केली जाते ? याचे वर्णन या ग्रंथात आहे. जहाज निर्मितीच्या विषयावर या ग्रंथाला प्रमाण मानले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांच्या निर्मितीसाठी भिन्न-भिन्न प्रकारच्या लाकडांची निवड कशी करावी ? यापासून आरंभ करत विशिष्ट क्षमतेचे जहाज आणि त्याचा संपूर्ण ढाचा कसा निर्मित करावा ? याचे संपूर्ण गणित या ग्रंथातून प्राप्त होते. नौकांचे प्रकार, त्यांचा आकार, नाव इत्यादींचे विश्लेषण यात केले आहे.
१०. नौकाशास्त्राला लागलेली उतरती कळा
जहाजांद्वारे जगभरात भारताचा व्यापार चालत होता; परंतु ११ व्या शतकात जे नौकाशास्त्र परमोच्च स्थानावर होते, त्याला हळूहळू उतरती कळा लागली. याला २०० वर्षांचे विजयनगर साम्राज्य अपवाद राहिले. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःची नौसेना स्थापित केली आणि सरदार आंग्रे यांनी ते बळकट केले; परंतु ११ व्या शतकाच्या आधीचे वैभव भारतीय जहाज निर्मितीमध्ये पुन्हा कधीही प्राप्त झाले नाही.
११. भारतीय जहाजांची क्षमता, गुणवत्ता आणि त्यांची डागडुजी यांविषयी ब्रिटीश अधिकार्याने व्यक्त केलेले मत
इंग्रजांच्या भारत आगमनापूर्वीपर्यंत भारतात जहाज निर्माणाची प्राचीन विद्या जीवित होती. १७ व्या शतकापर्यंत युरोपियन देशांमध्ये अधिकतम ६०० टन क्षमतेच्या जहाजाची निर्मिती केली. त्याच कालखंडात भारतात ‘गोदा’ नावाच्या जहाजाची निर्मिती करण्यात आली की, जे १ सहस्र ५०० टनापेक्षाही अधिक मोठे होते. वर्ष १८११ मध्ये ब्रिटीश अधिकारी लेफ्टनंट वॉकर लिहितो, ‘ब्रिटीश जहाजांची प्रत्येक १०-१२ वर्षांनंतर दुरुस्ती करावी लागत असे; मात्र सागवानी लाकडाने बनलेल्या भारतीय जहाजाची ५० वर्षांत कसलीही डागडुजी (दुरुस्ती) न करता ते उत्तम काम करत आहे आणि जहाजांची हीच गुणवत्ता पहाता ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने ‘दरिया दौलत’ नावाचे एक भारतीय जहाज खरेदी केले होते. जे ८७ वर्षांपर्यंत सतत कोणतीही डागडुजी न करता उत्तम प्रकारे काम करत राहिले.’
१२. भारत ब्रिटीश अधिपत्याखाली असतांनाही जहाजांची निर्मिती करण्यात अग्रणी !
इंंग्रजांनी दिलेल्या अधिकाधिक संख्येनुसार वर्ष १७३३ ते १८६३ या कालावधीमध्ये एकट्या मुंबईच्या एका कारखान्यात जवळजवळ ३०० पेक्षा अधिक जहाजांची निर्मिती झाली, ज्यातील अधिकांश जहाजे ब्रिटनच्या महाराणीच्या शाही नौसेनेमध्ये समाविष्ट केली. यापैकी ‘एशिया’ नावाचे जहाज २ सहस्र २८९ टनाचे होते आणि ते ८४ तोेफांंनी सुसज्जित होते. बंगालमध्ये चटगांव, हुगली (कोलकाता), सिलहट आणि ढाकामध्येही जहाज निर्मितीचे कारखाने होते. वर्ष १७८१ ते १८८१ पर्यंत, म्हणजेच १०० वर्षांमध्ये एकट्या हुगली कारखान्यामध्ये २७२ लहान-मोठ्या जहाजांची निर्मिती करण्यात आली. याचाच अर्थ जेव्हा भारतीय जहाज निर्मिती पतनाच्या काळात या परिस्थितीत होती, तर ११ व्या शतकाच्या पूर्वी भारताचा जहाज निर्मिती उद्योग किती समृद्ध असेल ? याचा सर्वसामान्य अंदाज करू शकतो.
१३. ‘वास्को द गामा’च्या भारताच्या शोधाविषयी इंग्रजांनी पसरवलेला भ्रम आणि त्यामागील सत्य
इंग्रजांनी आणखी एक भ्रम पसरवला की, वास्को द गामा याने समुद्र मार्गाने भारतात येण्याचा मार्ग शोधून काढला. हे सत्य आहे की, वास्को द गामा भारतात आला होता; परंतु तो कसा आला, यामागील सत्य आपण जाणून घेतले, तर आपल्याला वास्तविकता स्पष्ट होईल की, नेमके काय आहे ? प्रसिद्ध पुरातत्ववेत्ता पद्मश्री डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर हे त्यांच्या एका शोधाच्या संबंधाने इंग्लंडला गेले होते. तेथे एका संग्रहालयामध्ये त्यांना वास्को द गामाची हस्तलिखित दैनंदिनी (डायरी) दिसून आली. त्यांनी ती दैनंदिनी पाहिली आणि त्याचा अनुवाद वाचला. त्यामध्ये वास्को द गामाने स्वतः वर्णन केले आहे की, तो भारतात कसा कसा पोचला.
त्याने लिहिले आहे, ‘‘जेव्हा त्याचे जहाज आफ्रिकेमध्ये जंजीबारच्या जवळ आले, तर आपल्याकडे असलेल्या जहाजापेक्षा ३ पटींनी मोठे असलेले जहाज मी पाहिले. तेव्हा एक आफ्रिकन दुभाषी घेऊन तो त्या जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. जहाजाचा मालक चंदन नावाचा एक गुजराती व्यापारी होता, जो भारतवर्षातून चीड (पाईन) आणि सागवान लाकूड अन् मसाले घेऊन तेथे गेला होता आणि त्या बदल्यात हिरे घेऊन तो कोचीनच्या बंदरावर येऊन व्यापार करत होता. वास्को द गामा जेव्हा त्याला भेटण्यासाठी पोचला, तेव्हा तो चंदन नावाचा व्यापारी सामान्य वेशामध्ये एक खाटेवर बसला होता. त्या व्यापार्याने वास्को द गामाला विचारले, ‘‘तुम्ही कुठे जात आहात ?’’ वास्को द गामाने म्हटले, ‘‘हिंदुस्थानात फिरायला जात आहे.’’ तेव्हा त्या व्यापार्याने म्हटले, ‘‘मी उद्या (हिंदुस्थानला) चाललो आहे. आपण माझ्या मागे-मागे यावे.’’ अशा प्रकारे त्या व्यापार्याच्या जहाजाच्या मागे मागे वास्को द गामा भारतात पोचला. स्वतंत्र देशात हे सत्य नवीन पिढीला सांगितले गेले पाहिजे होते; परंतु दुर्भाग्याने तसे झाले नाही.
१४. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीवर भारतीय जहाजे खरेदी न करण्याविषयी टाकलेला दबाव
असे असूनही अशा उत्तम गुणवत्तेची जहाजे पाहून इंग्लंडमध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीवर दबाव टाकू लागले की, भारतीय जहाजे खरेदी करू नयेत, नाहीतर तेथील जहाज उद्योग नष्ट केले जातील. वर्ष १८८१ मध्ये लेफ्टनंट वॉकर याने उघडपणे आकडे देऊन सिद्ध केले, ‘भारतीय जहाजांना अधिक देखरेखेची आवश्यकता लागत नाही आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा व्ययसुद्धा अल्प पैशात होतो.’ (हे पत्र ब्रिटीश संग्रहालयाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहे.) लंडनच्या बंदरावर असलेल्या जहाज निर्मिती कारागिरांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या संचालक मंडळाला पत्र लिहिले, ‘जर आपण भारतीय जहाजांचाच उपयोग करू लागलो, तर आमच्यावर भूकबळी आणि बेरोजगारी यांचे संकट दाटून येर्ईल, आमची दशा पुष्कळ बिकट होऊन जाईल.’ यावर ब्रिटीश संसदेने सर राबर्ट पीलच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली.
१५. ब्रिटिशांनी इंग्लंड आणि भारत येथे जहाजांविषयी केलेला काळा कायदा अन् नौकानिर्मिती कलेचा अंत !
समितीच्या सदस्यांमध्ये परस्पर मतभेद होऊनसुद्धा या अहवालाच्या आधारावर वर्ष १८१४ मध्ये एक कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार भारतीय खलाशांना ब्रिटीश नाविक बनवण्याचा अधिकार राहिला नाही, तसेच हा नियम बनवला गेला की, इंग्लंडमध्ये इंग्रजांनी बनवलेल्या जहाजांमधूनच बाहेरील माल तेथे येऊ शकेल. काही कारणांमुळे हा कायदा वर्ष १८६३ पासून कार्यान्वित करण्यात आला. भारतातही असे कायदे-नियम बनवले गेले, ज्यामुळे येथील प्राचीन नौकानिर्मिती कलेचा अंत होईल. भारतीय जहाजांवर भरलेल्या मालावर कर लादण्यात आला आणि अशा प्रकारे त्यांना व्यापार करण्यापासून वेगळे टाकण्याचा प्रयत्न झाला. थोडक्यात भारतीय नौकानिर्मिती कला नष्ट करण्याची ही कथा आहे.
१६. इंग्लंडच्या राणीने विशेष अध्यादेशाद्वारे भारतीय जहाजांच्या निर्मितीवर लावलेला प्रतिबंध
ईस्ट इंडिया कंपनीने त्या कारागिरांना आणि इंग्लंडच्या व्यापार्यांच्या गोष्टींवर अधिक लक्ष दिले नाही; कारण की भारतीय जहाजांचा उपयोग करण्यात त्यांना व्यापारी लाभ होता; परंतु वर्ष १८५७ च्या क्रांतीनंतर भारताची संपूर्ण सत्ता पूर्णपणे जेव्हा इंग्लंडच्या राणीच्या हातात आली, तेव्हा राणीने एक विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर प्रतिबंध लावला. वर्ष १८६३ पासून हा प्रतिबंध लागू झाला आणि एक अत्यंत वैभवशाली, समृद्ध आणि तंत्रज्ञान रूपाने अत्याधिक प्रगत भारतीय नौकानयनशास्त्राचा मृत्यू झाला.’’ या संदर्भात सर विलियम डिग्बी याने लिहिले, ‘पाश्चिमात्य देशाच्या एका सामर्थ्यवान महाराणीने सागराच्या महाराणीची अक्षरशः हत्या केली.’
अशा प्रकारे जगाला ‘नेव्हिगेशन’सारखा शब्द देण्यापासून आधुनिक नौकानयनशास्त्र शिकवणारे भारतीय नाविकशास्त्राचे आणि उन्नत-समृद्ध जहाज निर्माण करणार्या उद्योगाचा अकाली अंत झाला.
(समाप्त) (२८.९.२०२०)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मानवाचे जीवन सुगम करण्यासाठी धर्म आणि विज्ञान हे परस्परांना पूरक असणे परम आवश्यक !विज्ञान आणि धर्म या दोन्हीचाही उद्देश मानव जातीचे कल्याण करण्याचा आहे, तरीही दोन्ही एक-दुसर्याच्या विरोधी कसे होऊ शकतात ? विज्ञान भौतिक पदार्थांचे अध्ययन, तर तोच अध्यात्माच्या साहाय्याने चेतनेचे अध्ययन करू शकतो. विज्ञानाला विश्वासंबंधी माहिती घेण्याची तीव्र इच्छा असते आणि येथूनच अध्यात्माच्या भूमिकेला आरंभ होतो. धर्म आणि विज्ञान यांमधील परस्पर समन्वयानेच जीवमात्राचे कल्याण शक्य होते. विज्ञानाला जाणणार्याने हेसुद्धा जाणून घेतले पाहिजे की, धर्माविना विज्ञान अर्धवट आहे. प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइनने म्हटले होते, ‘धर्माविना विज्ञान लंगडे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आहे.’ धर्म आणि विज्ञान यांच्यासंबंधी स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘जेथे विज्ञान समाप्त होते, तेथून धर्माचा आरंभ होतो.’ जर धर्म नसेल, तर विज्ञानाने जेवढे म्हणून शोध लावले आहेत, ते सर्व मनुष्याच्या विनाशाचे सर्वांत मोठे कारण ठरतील. मानवाचे जीवन सुगम आणि सरळ बनावे, यासाठी धर्म अन् विज्ञान हे परस्परांना पूरक असणे परम आवश्यक आहे. – श्री. रमेश शिंदे |
संपादकीय भूमिका‘वास्को द गामाने भारताचा शोध लावला’, असे सांगण्यामागील षड्यंत्र जाणून खरा इतिहास शासनाने विद्यार्थ्यांना शिकवावा ! |