भारतातील प्राचीन नौकाशास्‍त्र : आर्यावर्ताची विश्‍वाला देणगी !

आज २८ फेब्रुवारी या दिवशी ‘राष्‍ट्रीय विज्ञानदिन’ आहे. त्‍या निमित्ताने…

धर्म आणि विज्ञान यांच्‍या परस्‍परविरोधी संकल्‍पनेचे मूळ भारतीय संस्‍कृतीमध्‍ये कुठेही आढळत नाही. आम्‍ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्‍या दृष्‍टीने धर्माचे एक अंग मानत होतो. भारतात कोणत्‍याही विद्यापिठाची पदवी घेतलेली नसतांनासुद्धा ज्ञानप्राप्‍त ऋषिमुनींनी आत्‍मसाक्षात्‍काराद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रकट केले आहेत. आमच्‍या येथे साक्षात् भगवंताच्‍या मुखातून निघालेल्‍या पवित्र भगवद़्‍गीतेच्‍या ७ व्‍या अध्‍यायाला ‘ज्ञान-विज्ञानयोग’ म्‍हटले आहे. भगवद़्‍गीतेच्‍या या अध्‍यायात विज्ञानासहित ज्ञानाचा विषय आणि ईश्‍वराच्‍या व्‍यापकतेची चर्चा केली आहे.

लाकडापासून बनवलेले जहाज

१. प्राचीन भारतातील विज्ञान विविध क्षेत्रांत समृद्ध

वैदिक काळापासूनच भारतात विज्ञानाची कितीतरी क्षेत्रे विकसित झाली होती. भौतिक, रसायन, वनस्‍पतीशास्‍त्र, कृषी, गणित, नक्षत्रविज्ञान, जीवविज्ञान, आयुर्वेद, धातूविज्ञान आणि विविध कला-कौशल्‍य यांचेसुद्धा अध्‍ययन करणे अन् उपयोगात आणण्‍याचे प्रायोगिक क्षेत्र होते. जेव्‍हा वेद, उपनिषदे इत्‍यादी प्राचीन ग्रंथांमध्‍ये वर्णन केलेल्‍या काही घटना वैज्ञानिक विकासाचे प्रमाण देतात. उदा. उपमन्‍यूची नेत्रज्‍योत अश्‍विनी कुमार यांनी परत आणली होती. विभिन्‍न देवतांचे विमान (अंतरिक्षयान), दिव्‍यास्‍त्रांचे वर्णन, रामायणात इच्‍छेनुसार चालणारे पुष्‍पक विमान इत्‍यादी वाचतो. यातून एका विकसित सभ्‍यतेचे प्रमाण मिळते.

२. वेदकाळापासून प्राचीन भारताचे प्रगत नौकाशास्‍त्र

 

श्री. रमेश शिंदे

भारत ३ बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. प्राचीन भारतीय लोकांनी समुद्र प्रवास करण्‍यासाठी सर्वप्रथम नौका निर्माण केल्‍या होत्‍या. वैदिक युगाच्‍या नागरिकांची छबी साधारणतः नाविकांची आहे की, जी सरस्‍वती घाटावरील सभ्‍यतेच्‍या ऐतिहासिक अवशेषांशी मिळती-जुळती आहे. भारतात नौवहनाची कला आणि नौवहनाचा जन्‍म ६ सहस्र वर्षांपूर्वी प्रथम सिंधु नदीमध्‍ये झाला. इंग्रजी शब्‍द ‘नेव्‍हिगेशन’चा उद़्‍गम संस्‍कृत शब्‍द ‘नावगती’पासून झाला आहे. ‘नेव्‍ही’ म्‍हणजे नौसेना हा शब्‍दसुद्धा ‘नौ’पासून निघाला आहे. ‘नौवहन’ शब्‍दही ‘नावगती’पासून उत्‍पन्‍न झाला आहे. वर्तमानात भारतीय नौसेनेचे ध्‍येय वाक्‍य आहे ‘शं नो वरुण:’ म्‍हणजे ‘जल देवतेने आमच्‍यावर कृपा करावी.’

हिंदु ग्रंथांमध्‍ये अदितीचे पुत्र वरुणदेवाला समुद्राची देवता मानले गेले आहे. ऋग्‍वेदानुसार वरुणदेव सागराच्‍या सर्व मार्गांचे ज्ञाता आहेत. ऋग्‍वेदामध्‍ये नौकेने समुद्र पार केल्‍याचे कित्‍येक उल्लेख मिळतात. १०० नाविकांद्वारे मोठे जहाज सापडल्‍याचा उल्लेखही मिळतो. ऋग्‍वेदामध्‍ये सागरी मार्गाने व्‍यापारासह भारताच्‍या दोन्‍ही महासागरांचा (पूर्वी आणि पश्‍चिमी) उल्लेख आहे, ज्‍यांना आज बंगालची खाडी आणि अरबी समुद्र म्‍हटले जाते. अथर्ववेदामध्‍ये अशा नौकांचा उल्लेख आहे की, ज्‍या सुरक्षित, विस्‍तारित आणि आरामदायकही होत्‍या. ऋग्‍वेदामध्‍ये सरस्‍वती नदीला ‘हिरण्‍यवर्तनी’ (सुवर्ण मार्ग) आणि सिंधु नदीला ‘हिरण्‍यमयी’ (स्‍वर्णमयी) म्‍हटले आहे. सरस्‍वती क्षेत्रापासून सुवर्ण (सोने) धातू काढून ते निर्यात केले जात असे. त्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य वस्‍तूंची निर्यात सुद्धा केली जात होती.

३. इसवी सनपासून ३ सहस्र वर्षांपूर्वी लागलेला जहाजाचा शोध

काही विद्वानांचे मत आहे की, भारत आणि शत्तेल अरबची खाडी अन् फरात (Euphrates) नदीवर वसलेल्‍या प्राचीन खल्‍द (Chaldea) देशाच्‍या मध्‍ये इसवी सनपासून ३ सहस्र वर्षांपूर्वी जहाजांची ये-जा होत असे. याज्ञवल्‍क्‍य संहिता, मार्कंडेय आणि अन्‍य पुराणांमध्‍येही अनेक ठिकाणी जहाज अन् समुद्रयात्रा संबंधित कथा, तसेच वार्ता आहेत.

४. रामायण आणि महाभारत यांचा काळ अन् नौका

भारतानेच पहिल्‍यांदा नदीमध्‍ये नौका आणि समुद्रात जहाजे उतरवली होती. रामायणानुसार रावणाजवळ वायूयानासह कित्‍येक समुद्र जलपोतसुद्धा (जहाजे) होते. रामायणात केवटचा प्रसंग येतो. राम जेव्‍हा वनवासाला गेला, तेव्‍हा वाल्‍मीकि रामायण आणि शोधकर्त्‍यांच्‍या अनुसार ते सर्वांत प्रथम तमसा नदी येथे पोचले, जी अयोध्‍येपासून २० कि.मी. अंतरावर आहे. त्‍यानंतर त्‍यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराजपासून २०-२२ कि.मी. दूर ते श्रृंगवेरपूरला पोचले, जेथे निषादराज गुहचे राज्‍य होते. येथे गंगेच्‍या तीरावर त्‍यांनी केवटला गंगा पार करण्‍यासाठी सांगितले होते.

भगवान श्रीकृष्‍ण सखा आणि बलराम यांच्‍यासह सरस्‍वती नदीत नौकेच्‍या माध्‍यमातून मथुरेपासून द्वारिकेला पोचल्‍याचा उल्लेख मिळतो. जरी भारताच्‍या प्राचीन ग्रंथांचा एक मोठा भाग लुप्‍त झाला असला, तरी वेद, पुराणादि जेवढे म्‍हणून प्राचीन ग्रंथ आता उपलब्‍ध आहेत, त्‍यांच्‍या अध्‍ययनावरून सिद्ध होते की, वैदिक काळातही भारतीय लोक मजबूत जहाज बनवून समुद्र पार करत दूरच्‍या देशांमध्‍ये व्‍यापार आणि दिग्‍विजयासाठी जात. राजा भोजराजच्‍या काळात लिहिलेल्‍या ‘युक्‍तिकल्‍पतरू’ या संस्‍कृत ग्रंथामध्‍ये नौका आणि जहाज यांचे १०-१० भेदसुद्धा सांगितले आहेत. भारतवर्षाचे प्राचीन वाङ्‌मय वेद, रामायण, महाभारत, पुराण इत्‍यादीमध्‍ये जहाजांचा उल्लेख येतो. उदाहरणार्थ वाल्‍मीकि रामायणाच्‍या ‘अयोध्‍या कांड’मध्‍ये अशा मोठ्या नौकांचा उल्लेख येतो.

५. वराहमिहिर आणि राजा भोज यांनी जहाज निर्मितीवर केलेले लिखाण

५ व्‍या शतकात झालेल्‍या वराहमिहिर कृत ‘बृहत्‌संहिता’ आणि ११ व्‍या शतकातील राजा भोज कृत ‘युक्‍तिकल्‍पतरू’मध्‍ये जहाज निर्मितीवर प्रकाश टाकला आहे. आर्यभट्ट आणि वराहमिहिर यांनी नक्षत्रांना ओळखून सागर यात्रेच्‍या मानचित्रांची निर्मितीकलाही दर्शवली आहे. त्‍यासाठी एका मत्‍स्‍य यंत्राचा उपयोग केला जात असे. ज्‍याला आधुनिक ‘चुंबकीय दिशादर्शक’ (मॅग्‍नेटिक कंपास) असे म्‍हणतात. या यंत्रात ज्‍याप्रमाणे तेल द्रव्‍यावर तरंगत रहाते, त्‍याप्रमाणे लोखंडाची एक मासळी तरंगत रहाते आणि ती सदैव उत्तर दिशेला स्‍वतःचे मुख करून असते.

६. प्राचीन काळापासून भारतियांना असलेले नौकायानाचे ज्ञान आणि त्‍यांचे हिंदी महासागरावरील वर्चस्‍व

भारतीय पौराणिक ग्रंथांमध्‍ये महासागर, समुद्र आणि नद्या यांच्‍याशी संबंधित अशा अनेकानेक घटनांचा उल्लेख आहे. यातून हेच सत्‍य सिद्ध होते की, भारतियांना नौकायानाचे ज्ञान आदिकाळापासून होते आणि मानवाला समुद्र अन् महासागररूपी संपदेपासून पुष्‍कळ लाभ झाला आहे. प्राचीन काळापासून १३ व्‍या शतकापर्यंत हिंदी महासागरावर भारतीय उप-महाद्वीपाचे वर्चस्‍व कायम राहिले होते. राजनैतिक कारणांमुळे अधिक व्‍यापारासाठी भारतीय समुद्रीमार्गाचा उपयोग करत असत. अशा प्रकारे १६ व्‍या शतकापर्यंतच्‍या काळात देशांचे मध्‍य समुद्राच्‍या मार्गाने होणारा व्‍यापार, संस्‍कृती आणि परंपरागत देवाण-घेवाण होत असल्‍याच्‍या साक्षी आहेत. हिंदी महासागराला नेहमी एक विशेष महत्त्वाचे क्षेत्र मानले जात असे आणि भारताचे या महासागरात केंद्रस्‍थानाचे महत्त्व राहिले आहे.

७. दक्षिण-पूर्व आशिया देशांमधील हिंदु संस्‍कृतीवरून भारतीय नौकायनशास्‍त्र प्राचीन अन् प्रगत असल्‍याचे अधोरेखित !

जावा, सुमात्रा, मलय, सिंहपूर, सयाम, यवद्वीप इत्‍यादी सर्व तत्‍कालीन देश जे वर्तमानकाळात इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कंबोडिया, व्‍हिएतनाम इत्‍यादी नावांनी ओळखले जातात. या प्रदेशांमध्‍ये दोन-अडीच सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारताचे हिंदु राजे गेले होते. असा कोणताही पुरावा मिळत नाही की, भारतातून गेलेल्‍या राजांनी तेथे जाऊन भीषण युद्ध केले. याउलट शांतीपूर्ण प्रकारे आणि स्‍वतःच्‍या समृद्ध संस्‍कृतीच्‍या बळावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हळूहळू हिंदु विचारांना स्‍वतःचे मानू लागला. हिंदु राजे आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्‍यांतून दक्षिण-पूर्व आशियाच्‍या देशांमध्‍ये समुद्री मार्गानेच गेले, म्‍हणजे त्‍या कालखंडात भारतात नौकायन शास्‍त्र अत्‍यंत प्रगत स्‍थितीमध्‍ये होते. यावरून असे निश्‍चित म्‍हटले जाऊ शकते की, भारतियांकडे उत्तम दिशा ज्ञान आणि समुद्री वातावरण यांची संपूर्ण जाण होती. यावरून हेच सिद्ध होते की, भारतियांचे नौकायन शास्‍त्र त्‍या काळात अत्‍याधिक प्रगत असलेच पाहिजे.

                                         (क्रमशः) (२८.९.२०२०)

– श्री. रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती.