आत्महत्या करणारे बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी ! – सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा दावा

भाग्यनगर (तेलंगाणा) – समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाविषयी सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी नमूद केलेले आहे, ‘आत्महत्येमुळे मरण पावलेले बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी होते’, असा दावा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. ते येथील ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’च्या १९ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात बोलत होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की,

१. आपण मागील ७५ वर्षांमध्ये प्रतिष्ठित संस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले; परंतु त्यापेक्षा अधिक आपल्याला समाजाविषयी सहानुभूती दाखवणार्‍या संस्था निर्माण करण्याची आवश्यक आहे. सहानुभूतीच्या अभावाचे सूत्र थेट भेदभाव करण्याच्या वृत्तीशी निगडित आहे.

२. न्यायाधीश कधीही सामाजिक वास्तवापासून दूर जाऊ शकत नाहीत. न्यायालयीन संवाद हा जगभरात एकसमान आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्येनंतर जेव्हा ‘ब्लॅक लीव्ह मॅटर’ (कृष्णवर्णियांच्या जीवनालाही महत्त्व आहे !) ही चळवळ उभी राहिली, तेव्हा अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व ९ न्यायाधिशांनी कृष्णवर्णीय जीवनाचा र्‍हास आणि अवमूल्यन होत असल्यावरून न्यायव्यवस्थेला एक संयुक्त निवेदन सादर केले होते. त्याचप्रमाणे भारतातील न्यायाधिशांनी न्यायालयाच्या आत आणि न्यायालयाच्या बाहेर समाजाशी संवाद साधायला हवा.