जगभरात ‘जिहादी वधू’ म्हणून कुप्रसिद्ध असणारी शमीमा बेगम हिला ब्रिटनचे नागरिकत्व देण्यास तेथील न्यायालयाने नकार दिला. वर्ष २०१५ मध्ये १६ वर्षीय खादिजा सुलताना आणि १५ वर्षीय अमिरा अबेस या धर्मांध मुलींसोबत शमीमाने ब्रिटनमधून पळ काढून सीरिया गाठले. त्या वेळी शमीमा १५ वर्षांची होती. हे वय स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याचे, जीवनात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी धडपडण्याचे असते. शमीमानेही तिचे ध्येय निश्चित केले होते, ते म्हणजे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याशी विवाह करून त्याच्या जिहादी कृत्यात साथ देण्याचे ! वर्ष २०१५ मध्ये इस्लामिक स्टेटने जगभरात हैदोस घातला होता. सीरियात बसून इस्लामिक स्टेटचे आतंकवादी जगभरातील धर्मांधांना सीरियात येऊन आतंकवादी कृत्यात सहभागी होण्यासाठी चिथावत होते. या आतंकवाद्यांना त्यांची ‘संख्या’ वाढवण्यासाठी ‘यंत्रां’ची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी जगभरातील धर्मांध मुलींना इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी विवाह करण्याचे आवाहन केले. त्यासाठी हातात अत्याधुनिक रायफली घेतलेले, शिरच्छेद केलेल्या लोकांचे मुंडके हातात घेतलेले, चिथावणीखोर वक्तव्ये करणारे युवक यांची सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात ‘फलकबाजी’ करण्यात आली. या आवाहनांना शमीमा भुलली आणि तिने ‘जिहादी वधू’ होण्याचा निर्णय घेतला. शमीमा ही काही इस्लामी देशांतील मुलगी नव्हती, तर स्वतंत्र विचारांचा समाज असलेल्या ब्रिटनमधील बांगलादेशी वंशाची मुलगी होती. तरीही तिला हे ‘स्वातंत्र्य’ बोचले आणि तिने ओसाड, मागास अन् मध्ययुगीन वातावरण असलेल्या सीरियात जाऊन बुरख्यात रहाण्याचा निर्णय घेतला. ‘ती थेट जिहादी आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होती का ?’, हा प्रश्न वादग्रस्त असू शकतो; कारण कुणी म्हणते, ‘ती आत्मघातकी आतंकवाद्यांसाठी ‘जॅकेट’ बनवण्याचे काम करत होती’, तर काहींचे म्हणणे आहे की, तिने केवळ जिहादी आतंकवाद्याशी विवाह केला असून ती प्रत्यक्षात जिहादी कारवायांमध्ये सहभागी नव्हती. कारण काहीही असो, तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ‘जिहाद’ होता. त्यामुळे तिला सहानुभूती का दाखवावी ? असे असले, तरी जगभरातील मानवाधिकारवाले, तसेच ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’वाल्यांनी गळा काढायला आरंभ केला आहे. ‘झाले गेले विसरून जावे’, यानुसार शमीमाची ‘चूकभूल’ पोटात घालून तिला मोठ्या मनाने क्षमा करण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला ब्रिटीश सरकारने भीक घातली नाही, हे चांगलेच झाले. जिहादी आतंकवादी किंवा त्यांना साथ देणारे हे ‘वाट चुकलेले’ नसतात, तर त्यांनी जिहादसाठी जाणूनबुजून ती वाट चोखाळलेली असते. बरं शमीमा हिला तिने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप आहे का ? वर्ष २०१९ मध्ये तिने दिलेल्या मुलाखतीत तिने ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी झाल्याविषयी खंत नसल्याचे सांगितले होते. तसेच मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ योग्य असल्याचेही म्हटले होते. ज्यांना त्यांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य इस्लामिक स्टेटमध्ये दिसते, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे; म्हणजे समाजाची शांतता धोक्यात घालण्यासारखे आहे. अशा जिहादी मानसिकतेच्या युवतीविषयी बीबीसीसारखी ब्रिटीश प्रसारमाध्यमे गळा काढतात, हे संतापजनक होय.
समुपदेशन आणि आतंकवाद !
शमीमा बेगम हिला ब्रिटीश नागरिकत्व न देण्याच्या निर्णयानंतर ‘वाट चुकलेल्यां’ना संधी देण्याविषयी, त्यांचे समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये बरेच बोलले किंवा लिहिले जात आहे. मुळात ‘लहान वयातील धर्मांध मुले ‘ब्रेन वॉशिंग’मुळे जिहादी होतात’, हे म्हणणे हास्यास्पद आहे. आता सादिया शेखचेच उदाहरण घ्या. काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी पुण्यातील येरवडा भागातील सादिया हिला अटक करण्यात आली. सादिया ही १७ वर्षांची असल्यापासून ती सुरक्षायंत्रणांच्या ‘रडार’वर होती. वर्ष २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये इस्लामिक स्टेटच्या संपर्कात आल्यामुळे तिची चौकशी करण्यात आली होती; मात्र अल्पवयीन असल्याने समुपदेशन करून तिला सोडून देण्यात आले. या समुपदेशनाचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. समुपदेशनाच्या वेळी मांडलेले विचार तिने एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून दिले आणि पुन्हा जिहादी कारवाया करण्यासाठी संधीची वाट पाहू लागली. अल्पवयीन म्हणून सोडून देण्याऐवजी तिला त्याच वेळी धडा शिकवला असता तर ? धर्मांध तरुणांच्या संदर्भात ‘समुपदेशन’ हे अस्त्र नेहमी वापरले जाते; मात्र बर्याचदा मूलतत्त्ववादी विचार हे समुपदेशनावर भारी पडतात. ‘असे का होते ?’, याचे उत्तर त्यांना देण्यात येणार्या जिहादी शिकवणीमध्ये आहे. जिहादच्या नावाने इतरांना मारणे किंवा मारता मारता स्वतः मरणे हे त्यांच्यासाठी आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते. हा विचार समुपदेशनाने कसा नष्ट करणार ?
‘आयुष्यात दुसरी संधी द्यायला हवी’, असे सांगणार्यांनी ‘ती देण्यासाठी आतंकवादी त्या पात्रतेचे असतात का ?’, याचाही विचार करायला हवा. ‘शमीमाला दुसरी संधी द्यायला हवी’, असे म्हणणारे तिच्या जिहादी मानसिकतेकडे डोळेझाक करत आहेत. शमीमा हिने एका मुलाखतीच्या वेळी ‘शरीयत कायद्यानुसार जीवन जगायचे, हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. इस्लामिक स्टेटमध्ये प्रवेश केल्यामुळे माझे आयुष्य पालटले. मी अधिक कणखर झाले’, असे सांगितले. अशा विचारसरणीचे लोक समाजासाठी घातक नव्हेत का ? आतंकवादी, धर्मांध आणि जिहादी मनोवृत्तीच्या लोकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन हा राष्ट्रघात आहे. अशा गांधीगिरी विचारसरणीचे लोक केवळ ब्रिटनमध्ये आहेत, असे नव्हे, तर ते भारतामध्येही आहेत. आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे. अशाने आतंकवादाला नक्कीच काही प्रमाणात तरी खीळ बसेल !
जिहाद्यांविषयी आपुलकी वाटणारे मानवाधिकारवाले समाजासाठी धोकादायक आहेत, हे जाणा ! |