आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाल्याविषयी सुस्पष्टता नाही

पणजी, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – आग्वाद किल्ला (गड) संग्रहालयातील फिरते मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाले आहे का याविषयी सुस्पष्टता नाही. गोवा सरकारने आग्वाद किल्ल्याचे आग्वाद किल्ला संग्रहालयात रूपांतर केले आहे. या संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र चालू झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र या विरोधात रोष व्यक्त झाला.

स्वातंत्र्यसैनिक संघटनेने हे मद्यविक्री केंद्र बंद न केल्यास सत्याग्रह चालू करण्याची चेतावणी दिली. वाढत्या दबावानंतर अखेर संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र बंद करण्यात आले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र बंद झाल्याने याविषयी निर्माण झालेला वाद आता मिटला आहे.’’ संग्रहालयातील हे मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाले आहे कि नाही याविषयी सुस्पष्टता नाही. मद्यविक्री केंद्र चालवणार्‍या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.