निधर्मीवाद्यांच्या विरोधानंतर ‘एयरो इंडिया २०२३’मधील विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले !

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एच्.ए.एल्) या सरकारी आस्थापनाने येथे ‘एयरो इंडिया २०२३’ नावाने ‘एअर शो’ (हवाई कवायती) आयोजित केला आहे. यामध्ये काही विमानांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात ‘एच्.एल्.एफ्.टी-४२’ हे लढाऊ विमानांचे प्रशिक्षण देण्यासाठी बनवण्यात आलेले विमान ठेवण्यात आले होते. त्याच्या मागच्या भागावर श्री हनुमानाचे आघात करण्याच्या मुद्रेतील चित्र रेखाटण्यात आले होते. यावरून कौतुकही होत असतांना आता अचानक हे चित्र विमानावरून काढून टाकण्यात आले आहे. हे विमान स्वदेशी बनावटीचे आहे.

१. विमानावर हनुमानाचे चित्र लावण्यात आल्याचे समजल्यावर सामाजिक माध्यमांतून यांवर टीका होऊ लागली. ‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे’, असे सांगत याला विरोध होऊ लागला. त्यामुळेच ते चित्र काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याविषयी अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

२. जेव्हा हे चित्र लावण्यात आले, तेव्हा या आस्थापनाकडून सांगण्यात आले होते की, हे विमान हनुमानाच्या शक्तीपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. यापूर्वी प्रशिक्षणासाठी विमान बनवण्यात आले होते, तेव्हाचे त्याचे नाव ‘मारूत’ ठेवण्यात आले होते. याचा अर्थ मारुति म्हणजे पवनदेव आणि त्यांचे पुत्र हनुमान. विमानावर हनुमानाचे चित्र रेखाटण्याची आमची जुनी परंपरा आहे आणि त्याला पुढे चालवले आहेत.

संपादकीय भूमिका

  • श्री हनुमानाने त्याला झालेले सर्व विरोध मोडून काढत विजय मिळवला होता, त्याच प्रमाणे सरकारी आस्थापनांनी निधर्मीवाद्यांचा होणारा फुकाचा विरोध मोडून काढून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
  • एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्‍या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?