विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

भाजपचे वरिष्ठ नेते अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची याचिकेद्वारे मागणी

श्री. अश्विनी उपाध्याय

नवी देहली – भाजपचे वरिष्ठ नेते अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी भारतातील गावे आणि शहरे यांना देण्यात आलेली विदेशी आक्रमकांची नावे पालटण्याची मागणी सर्वाेच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. अधिवक्ता उपाध्याय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून याविषयी माहिती दिली. शहरे किंवा गावे यांचे नामकरण करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करावी. या समितीने आक्रमकांनी संबंधित शहराला दिलेले नाव आणि त्या शहराचे मूळ नाव यांविषयी माहिती मिळवून ती सरकारला द्यावी आणि सरकारने पुढील प्रक्रिया करावी, असे यात म्हटले आहे.

१. या याचिकेमध्ये अधिवक्ता उपाध्याय यांनी आक्रमकांची नावे असलेली १ सहस्र गावे आणि शहरे यांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी नामकरणाच्या संदर्भात न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचीही माहितीही दिली आहे.

२. या याचिकेत काही उदाहरणे दिली आहेत. त्यानुसार बिहारमधील बेगूसरायचे नाव ‘अजातशत्रूनगर’ असे होते; मात्र बेगू या मुसलमान आक्रमकावरून त्याचे नाव बेगूसराय करण्यात आले. याच राज्यातील मुझफ्फरपूरचे पूर्वीचे नाव ‘विदेहपूर’ असे होते, तसेच हरिपूरचे हाजीपूर असे नामांतर करण्यात आले.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !