सातारा येथे आंबेघर-भोगवली सोसायटीमध्‍ये ८४ लाख ३९ सहस्र रुपयांचा घोटाळा !

सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – जावळी तालुक्‍यातील आंबेघर-भोगवली येथील ‘विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्‍थे’त ८४ लाख ३९ सहस्र २७९ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी सोसायटीचे सचिव अजित तुकाराम रांजणे यांच्‍यावर मेढा पोलीस ठाण्‍यात फसवणुकीचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

जावळी तालुक्‍यातील आंबेघर-भोगवली वि.का.स. सेवा संस्‍थेचे वर्ष २०२१-२२ चे लेखापरीक्षण करण्‍यात आले. यामध्‍ये हा अपहार उघड झाला. सोसायटीचे सचिव अजित रांजणे यांनी पदाचा अपलाभ उठवत सभासदांच्‍या नावावर परस्‍पर कर्ज उचलले, कर्जदारांची दिशाभूल करून चलनाद्वारे कर्जदारांचे पैसे काढून घेतले, काही सभासदांकडून कर्जाच्‍या वसुलीचे पैसे घेऊन बँकेत न भरता स्‍वतःकडे ठेवले, काही कर्जदारांना बँकेची नसलेली वसुलीची चलने दिली, काही कर्जदारांना कर्ज असूनही कर्ज नसल्‍याचा खोटा दाखला दिला, सभासदांच्‍या येणे-देणे व्‍यवहाराच्‍या खोट्या नोंदी केल्‍या, अशा पद्धतीने कर्जदारांची ८४ लाख ३९ सहस्र २७९ रुपयांची फसवणूक अजित रांजणे यांनी केली आहे. याविषयी लेखापरीक्षक गणेश पोफळे यांनी मेढा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांनी रांजणे यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला आहे.