बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

  • मृताच्या कुटुंबियांनी काँग्रेसला ठरवले उत्तरदायी !

  • काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप !

कोलकाता – बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील मारग्राम येथे झालेल्या बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता न्यूटन शेख हा ठार झाला आहे. तसेच तृणमूलच्याच पक्षाचा पंचायत प्रमुखाचा भाऊ लाल्टू शेख हा घायाळ झाला आहे. न्यूटन शेख याच्या कुटुंबियांनी, ‘या आक्रमणासाठी काँग्रेसचे समर्थक उत्तरदायी आहेत’, असा आरोप केला आहे.

१. या स्फोटावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे शहर विकास मंत्री फिरहाद हाकिम म्हणाले की, या आक्रमणामध्ये माओवादी सहभागी असल्याची शक्यता आहे; कारण या जिल्ह्याची सीमा झारखंड राज्याला लागून आहे.

२. याविषयी बंगाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, मारग्राममध्ये काँग्रेसकडे संघटनात्मक शक्ती नाही; मात्र हे लक्षात घेऊनही कुणी जर आमच्या पक्षाला प्रसिद्धी देऊ इच्छित असेल, तर आमचा आक्षेप नाही. प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत.

संपादकीय भूमिका

सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?