वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

ग्रंथदिंडीतील पालखीत ठेवलेले ग्रंथ

वर्धा – येथे ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्‍यात आले. दिंडीच्‍या संपूर्ण मार्गावर रांगोळ्‍या काढण्‍यात आल्‍या होत्‍या. सीताअशोक वृक्षाचे रोप लावल्‍यानंतर लेझीमचा नाद चालू झाला. दिंडीतील पालखीत असलेल्‍या ग्रामगीता आणि अन्‍य ग्रंथ यांचे पूजन करण्‍यात आले.

दिंडीच्‍या वेळी भगव्‍या टोप्‍या घातलेले विद्यार्थी राष्‍ट्रसंतांची भजने गात पुढे जात होते. २ सहस्र २०० विद्यार्थ्‍यांनी यात सहभाग घेतला होता. चित्ररथ, ऐतिहासिक स्‍थळांची सजावट असलेली विविध वाहने, तसेच बँडपथक यांचा यामध्‍ये समावेश होता. या वेळी सर्वजण विठूरायाचा गजर करत होते. नागरिक दिंडीवर पुष्‍पवर्षाव करत होते. या वेळी संमेलनाचे कार्यवाह प्रदीप दाते, आमदार डॉ. पंकज भोयर, मावळते संमेलनाध्‍यक्ष भारत सासणे, साहित्‍य महामंडळाच्‍या श्रीमती उषा तांबे आणि पदाधिकारी उपस्‍थित होते.