माहिती अधिकारात प्रकार उघड !
संभाजीनगर – संभाजीनगर स्मार्ट सिटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अनेकदा झाला आहे; मात्र आता आणखी एका प्रकरणाने स्मार्ट सिटीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीची मागणी केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे एक काम प्रशासनाने एका साध्या अर्जावर दिल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. तबरेज खान यांना ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे या कामाची निविदा का काढली गेली नाही ? असा प्रश्न विचारला जात आहे, तर या सर्व प्रकरणात अधिकार्यांनी कानावर हात ठेवत बचावाचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत १ सहस्र १०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील बहुतांश कामे निविदा पद्धत राबवून कंत्राटदारांना देण्यात आली आहेत; मात्र याचवेळी कोट्यवधी रुपयांचे एक काम प्रशासनाने साध्या अर्जावर दिले आहे. त्यामुळे आता अशाच पद्धतीने आणखी किती कामे देण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण ?
‘स्मार्ट सिटी’अंतर्गत कामासाठी अगोदर संचालक मंडळाची अनुमती घ्यावी लागते. त्यानंतर संबंधित कामाचे अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया राबवण्यात येते. मागील ५ वर्षांमध्ये सर्वच कामे निविदा पद्धतीने करण्यात आली; मात्र विविध दैनिकांना विज्ञापन देण्यासाठी प्रशासनाने ‘मिडिया हाऊस’ या खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीने ‘स्मार्ट सिटी’ला १७ डिसेंबर २०२० या दिवशी एक साधा अर्ज केला. या अर्जाच्या आधारावर १८ डिसेंबर २०२० या दिवशी एजन्सीची नेमणूक झाली. अवघ्या अडीच पानांच्या साध्या कागदावर करारही झाला. तिसर्या दिवशी एजन्सीला काम दिले.