सृष्‍टी आपली माता, नको उपभोगाची दृष्‍टी !

आपली हिंदु संस्‍कृती आपल्‍याला पुष्‍कळ मोठी शिकवण देऊन उत्तम संस्‍कार करणारी आहे. दुर्दैवाने आपण आपली संस्‍कृती आणि संस्‍कार यांकडे दुर्लक्ष करून आत्‍मघात करत आहोत. खरेतर ‘चराचरामध्‍ये ईश्‍वर वसला आहे’, अशी श्रद्धा निर्माण करण्‍यामागचा आपल्‍या संस्‍कृतीचा हेतू आपण ओळखला नाही. हा आपली बुद्धी आणि दृष्‍टी यांचा दोष आहे.  भूमी जशी आपली माता आहे, तशीच सृष्‍टीसुद्धा आपली माता आहे. सृष्‍टीतील प्रत्‍येक गोष्‍टीकडे उपभोगाच्‍या दृष्‍टीने माणसाने पाहू नये; म्‍हणून त्‍यातील देव शोधण्‍याची शिकवण संस्‍कृती आपल्‍याला देते.

जोशी मठाच्या परिसरातील भूस्खलनानंतर घरांना गेलेले तडे

१. निसर्गातील प्रत्‍येक गोष्‍टींंना देवत्‍व बहाल करण्‍यामागील कार्यकारणभाव

श्री. दुर्गेश परुळकर

वृक्ष, भूमी, पर्वत, वायू, नदी, सागर यांतील आणि भूमीच्‍या खाली दडलेली संपत्ती मानवासाठी नितांत उपयुक्‍त आहे; म्‍हणूनच त्‍यांची पूजा केल्‍यावाचून आपण कोणत्‍याही कार्याला आरंभ करत नाही. ही पूजा म्‍हणजेच कृतज्ञतेची भावना व्‍यक्‍त करणे होय. माणसाने नैसर्गिक साधन संपत्तीचा संयमाने स्‍वीकार केला, तर माणसाचा विकास होऊ शकतो; पण अधाशाप्रमाणे निसर्गातील संपत्तीची लूट माणसाने केली, तर निसर्गाचा समतोल ढळल्‍यावाचून रहाणार नाही. हे लक्षात घेऊनच आपल्‍या संस्‍कृतीने नैसर्गिक संपत्ती आणि निसर्गातील प्रत्‍येक गोष्‍ट यांना देवत्‍व बहाल केले आहे. ज्‍या गोष्‍टी आपल्‍याला उपयुक्‍त आहेत, त्‍या गोष्‍टींची आपण निगा राखणे, हेच आपल्‍या हिताचे आहे. अशी श्रद्धा निर्माण करण्‍यासाठी ‘निसर्गातील प्रत्‍येक गोष्‍टीत देवाचे अस्‍तित्‍व आहे’, असे मानण्‍यात आले. ही कृतज्ञतेची भावना आहे.

२. जोशी मठ क्षेत्र भूस्‍खलनप्रकरणी समित्‍यांनी दिलेल्‍या धोक्‍याच्‍या सूचना

आजच्‍या विज्ञानाच्‍या आधुनिक काळात सुखाची व्‍याख्‍या पालटली आहे. ‘आपल्‍या घरात जेवढी उपभोगाची साधने अधिक तेवढे आपण सुखी’, अशी सुखाची व्‍याख्‍या माणसाला विनाशाकडे नेणारी आहे. त्‍याचे दृश्‍य स्‍वरूप आपण अनेक वेळा अनुभवले आहे. नुकतेच अनुमाने ६ सहस्र फुटांच्‍या उंचीवर वसलेले जोशी मठ क्षेत्र भूस्‍खलनामुळे चिंतेचा विषय झाला आहे. गेली अनेक वर्षे अनेक तज्ञांच्‍या समित्‍यांनी ‘अशा प्रकारची आपत्ती भविष्‍यात आपल्‍यावर कोसळेल’, याची कल्‍पना दिली होती. या प्रकरणी वर्ष १९७६ मध्‍ये मिश्रा समिती स्‍थापन करण्‍यात आली होती. या समितीमध्‍ये एकूण १८ सदस्‍य होते. या समितीचे अध्‍यक्ष एम्.सी. मिश्रा होते. या समितीत भारतीय सैन्‍य, इंडो-तिबेट  सीमा सुरक्षा दल, केदारनाथ, बद्रीनाथ मंदिर आणि स्‍थानिक प्रशासन यांच्‍या प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने सर्वेक्षण करून जोशी मठाची भुसभुशीत भूमी, अलकनंदा नदीच्‍या पुरामुळे होणारे भूमीचे क्षरण (झीज) यांकडे लक्ष वेधले होते. काही धोक्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या; पण त्‍या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देण्‍यात आले नाही.

जोशी मठाच्या परिसरातील भूस्खलनानंतर रस्त्यांना गेलेले तडे

३. निसर्गाचा समतोल बिघडल्‍याने मानवाला भोगावे लागत असलेले परिणाम

उपभोगाचे व्‍यसन जडलेल्‍या मानवाला नैसर्गिक हानी हीच आपल्‍या विनाशाचे कारण आहे, याचे भान राहिले नाही. ‘आपण सर्वसामान्‍य आणि साधेपणाचे जीवन जगू लागलो, तर आपण पाषाण युगातील आहोत’, असे मानवाला वाटू लागले. वास्‍तविक आधुनिक काळातही संयमित जीवन जगणे, हेच सुशिक्षित आणि सुसंस्‍कृततेचे लक्षण आहे. ही गोष्‍ट मानवाच्‍या लक्षात आली नाही.

सातत्‍याने उपभोग घेत रहाणे, त्‍यासाठी विविध वस्‍तूंची निर्मिती करणे, त्‍याच्‍या कामाचा मोबदला म्‍हणून हातात पैसा खेळतो आहे, त्‍या पैशातून उपभोग्‍य वस्‍तूंचीच खरेदी केली जाते. त्‍या वस्‍तूच आपल्‍याला खर्‍या अर्थाने समाधान आणि आनंद देतात, सौख्‍य प्रदान करतात, अशी माणसाने समजूत करून घेतली. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा अधिकाधिक उपयोग करून आपल्‍या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पालटून कृत्रिम सौंदर्य निर्मितीकडे माणूस वळला. नैसर्गिक सौंदर्याकडे त्‍याने पाठ फिरवली. नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कृत्रिम सौंदर्याची भूल माणसाला पडली. मातीपेक्षा मातीखाली सापडणारे मौल्‍यवान कडेच (खनिज) माणसाला आकर्षित करू लागले. त्‍यामुळे मातीचे मोल राहिले नाही. या सर्व हव्‍यासापोटी माणसाने निसर्गाचा समतोल अधिकाधिक प्रमाणात बिघडवण्‍याचाच प्रयत्न केला. परिणामी वायू, जल, ध्‍वनी आणि भूमी यांसह अनेक प्रदूषणांनी मानवी जीवन त्रस्‍त झाले आहे. भौतिक विकासाकडे लक्ष दिल्‍यामुळे मन, बुद्धी आणि विचार यांचा विकास साधण्‍याचे राहून गेले.

निसर्गातील संपत्ती निर्माण होण्‍यासाठी कोट्यवधी वर्षे लागतात. माणसाने हव्‍यासापोटी निसर्गसंपत्ती दोन्‍ही हातांनी लुटण्‍याचे काम केले. परिणामी नैसर्गिक संपत्तीचा साठा रोडावत गेला. माणसाने जंगले नष्‍ट केली. आता तर शेतभूमी नष्‍ट होऊ लागल्‍या आहेत. कारखान्‍यांमधील अशुद्ध पाणी नद्या, नाले, समुद्र यांमध्‍ये सोडण्‍यात येते. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाला भौतिक सुखसोयी प्राप्‍त झाल्‍या; पण आरोग्‍य बिघडले. सकस अन्‍नाची वानवा निर्माण झाली आणि एका दुष्‍टचक्रात माणसाचे आयुष्‍य भरडून निघाले.

४. मानवाने निर्माण केलेली इलेक्‍ट्रॉनिक कचर्‍याची मोठी समस्‍या

इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण झालेल्‍या कचर्‍याचे विघटन करण्‍यासाठी निसर्गाचे साहाय्‍य मिळत नाही. नैसर्गिक वस्‍तूंचे विघटन निसर्गतः सहजतेने होते. तथापि मानवनिर्मित कृत्रिम वस्‍तूंचे विघटन करण्‍याची क्षमता निसर्गाची नाही. परिणामी हा इलेक्‍ट्रॉनिक कचरा हीच मोठी समस्‍या होऊन बसली आहे.

आतातर आपण अंतराळात प्रवेश केला आहे. हा पराक्रम आता आपला आत्‍मघात ठरतो आहे. आपण अंतराळात जेव्‍हा झेप घेतो, त्‍या वेळी विविध प्रकारचा कचरा आपण अंतराळात सोडतो. अवकाशातील वातावरण नियंत्रणाच्‍या बाहेर गेले की, त्‍याचे परिणाम पर्यावरणाच्‍या असंतुलनावर होतात. ‘अंतराळात फिरणार्‍या कचर्‍यामुळे सागरातील जीवसृष्‍टीला हानी पोचू शकते. असा हा ई-कचरा जीवघेणा ठरतो आहे’, असे तज्ञांचे म्‍हणणे आहे.

इलेक्‍ट्रॉनिक कचरा हा अजैविक घटकांपासून सिद्ध होतो. याचे उदाहरण सांगायचे, तर पारा, कँडियम बेरिलियम, शिसे यांसारखे धातू पर्यावरण दूषित करण्‍यास हातभार लावतात. या धातूंपासून निर्माण केलेली उत्‍पादने मानव आणि प्राणी यांच्‍या संपर्कात आल्‍यावर या जिवांना विविध प्रकारचे रोग होण्‍याची शक्‍यता असते. निर्माण केलेल्‍या वस्‍तूंचे क्षरण (झीज) न्‍यून होण्‍यासाठी त्‍यावर संरक्षककवच निर्माण केले जाते. परिणामी त्‍या वस्‍तू खराब किंवा त्‍यांचे विघटन होण्‍यास दीर्घ काळ लागतो.

१९७० च्‍या दशकात ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्‍थेचे सल्लागार डोनाल्‍ड जे केसलर यांनी एक सिद्धांत मांडला. त्‍या सिद्धांतानुसार ‘अवकाशातील कचर्‍याच्‍या ढिगांचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल आणि उपग्रहासारख्‍या वस्‍तू या कचर्‍याला आदळतील अन् अधिक कचरा निर्माण होईल.’ याचाच अर्थ माणसाने पृथ्‍वीच्‍या बाहेर जाऊन आपली प्रगती सिद्ध केली असली, तरीसुद्धा यातून आपणच मोठ्या प्रमाणात समस्‍या निर्माण केल्‍या आहेत.

५. निसर्गाची हानी न होण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक !

सध्‍या आपल्‍या पृथ्‍वीवरील तापमानात वाढ होत असल्‍याचे शास्‍त्रज्ञ सांगतात. त्‍याचा परिणाम म्‍हणून हिमनद्या वितळू लागल्‍या आहेत. जगातील विविध भागांतील तापमानात मोठ्या प्रमाणात पालट होत असलेला आढळतो. ऋतुमानात होणारा हा पालट पृथ्‍वीवरील संपूर्ण जीवसृष्‍टीला हानीकारक आहे. याचे अनुभव आपल्‍याला सांप्रत काळात वारंवार येत आहेत. यावर एकच उपाय म्‍हणजे आपण आताच आपल्‍या मनाला आवर घालून आता तरी पर्यावरणाची पर्यायाने निसर्गाची हानी होणार नाही आणि प्रत्‍येक जिवाचा अधिवास अधिकाधिक सुरक्षित अन् जीवन जगण्‍यास सुयोग्‍य असेल, याची काळजी घेतली पाहिजे. त्‍यासाठी सृष्‍टी ही माता असून तिच्‍याकडे उपभोगाच्‍या दृष्‍टीने पहावयाचे नाही, ही आपल्‍या संस्‍कृतीची शिकवणच आपल्‍याला तारू शकते, अन्‍यथा संपूर्ण जग जोशी मठासारखे हतबल होऊन वेगाने विनाशाच्‍या दरीत कोसळेल. (२५.१.२०२३)

– श्री. दुर्गेश परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते, डोंबिवली.

संपादकीय भूमिका

भूस्‍खलनाच्‍या प्रश्‍नावर समित्‍यांनी चेतावणी देऊनही उपाययोजना केली जात नसेल, तर त्‍याला उत्तरदायी कोण ?