अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई
पिंपरी (पुणे) – ‘दि सेवा विकास बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या घरावर २८ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धाड टाकली. त्या वेळी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. ‘सेवा’ बँकेतील अपव्यवहार प्रकरणातून ही धाड टाकण्यात आली होती. ‘ईडी’च्या पथकाने अमर मूलचंदानी यांना अटक केल्यानंतर त्यांनी छातीमध्ये दुखत असल्याचे अधिकार्यांना सांगितले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.
‘सेवा विकास बँके’त अध्यक्ष असतांना मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे १२४ प्रकरणी ४०० हून अधिक कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील अनेक प्रकरणांमध्ये अमर मुलचंदानी, अशोक मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी आणि सागर मूलचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे म्हणाल्या, ‘‘सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी अमर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलांना २९ जानेवारी या दिवशी कह्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.