जनमानसाला सुसंस्कृत करणे, हा कलेचा मूळ हेतू ! – जी.एस्. माजगावकर, चित्रकार

व्यंगचित्रकार श्री. गुरुदत्त खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन

श्री गणेशाचे चित्र रेखाटतांना श्री. गुरुदत्त खिलारे

बेळगाव (कर्नाटक) – व्यंगचित्र म्हणजे रेषांच्या माध्यमातून काढले जाणारे एक काव्यच आहे. जनमानसाला सुसंस्कृत करणे, हा कलेचा मूळ हेतू असायला हवा. आनंद निर्माण करणे, हे कलाकाराचे कर्तव्य असायला हवे. व्यंगचित्रामध्ये सहजता, कल्पकता आणि सूचकता हवी. व्यंगचित्रात व्यक्तीला हसवण्याची आणि अंतर्मुख करण्याची क्षमता असेल, तरच ती यशस्वी ठरतात, असे मत कोल्हापूर येथील चित्रकार श्री. जी.एस्. माजगावकर यांनी व्यक्त केले. व्यंगचित्रकार श्री. गुरुदत्त खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन कलामहर्षी के.बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी, वरेरकर नाट्यसंघ येथे भरवण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सूत्रसंचालन करतांना सौ. गौरी खिलारे (डावीकडे), तसेच उपस्थित मान्यवर

प्रारंभी श्री. जी.एस्. माजगावकर, बेळगाव येथील चित्रकार श्री. वसंत निर्मळे, श्री. गुरुदत्त खिलारे यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला खिलारे, सौ. गौरी खिलारे, श्रीमती मंजुळा खडेद यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळ मुकुंद पत्की, बेळगाव येथील चित्रकार प्राध्यापक श्री. अनिल पाटणेकर, प्राध्यापक सुषमा पाटणेकर, प्रायोजक पु.ना. गाडगीळ आणि ‘क्रिएटिव्ह क्लॅविकल मार्केटिंग एजन्सी’ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गुरुदत्त खिलारे यांच्या पत्नी आणि सनातनच्या साधिका सौ. गौरी खिलारे यांनी सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन ३० जानेवारीपर्यंत पहाण्यासाठी खुले होते.

मानवी जीवनातील तणाव व्यंगचित्रांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न ! – गुरुदत्त खिलारे

मनोगत व्यक्त करतांना १ व्यंगचित्रकार श्री. गुरुदत्त खिलारे, तसेच अन्य

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री. गुरुदत्त खिलारे म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात तणाव असतो, हा तणाव दूर करून व्यंगचित्राच्या माध्यमातून त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूच्या घटनांना स्पर्श करून व्यंगचित्र रेखाटतो. ही सर्व दैवी कृपा आहे. जेव्हा जेव्हा मी चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा ईश्वरी कृपेने ही चित्रे आपोआप साकारली जातात, असेच मला नेहमी जाणवते.’’

क्षणचित्रे

१. श्री. गुरुदत्त खिलारे यांनी प्रदर्शन पहाण्यास आलेल्या प्रेक्षकांचा आनंद अवघ्या २ मिनिटांत व्यंगचित्र काढून द्विगुणित केला.

२. प्रदर्शनाच्या प्रारंभी श्री. गुरुदत्त खिलारे यांनी श्री गणेश, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि अन्य काही व्यंगचित्रे रेखाटली.

३. निरांजनाने दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचा प्रारंभ करण्यात आला.