देहलीतील लोहस्तंभ : भारतीय तंत्रज्ञानाचे एक अत्युत्कृष्ट उदाहरण !

देहलीत गेली कित्येक शतके उभ्या असलेल्या लोहस्तंभाविषयी जगात कुतूहल आहे. लोहस्तंभाची उभारणी आणि एकूणच त्याला गंज लागू न देण्याचे तंत्रज्ञान यांविषयी कित्येक वर्षे संशोधन केले गेले आहे. या स्तंभाची निर्मिती ‘आर्किओलॉजिस्ट’च्या (पुरातत्व तज्ञांच्या) मते ‘साधारण १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी चंद्रगुप्त २ च्या काळात झालेली आहे’, असे निदान त्यावर असलेल्या शिलालेखावरून अंदाज बांधता येतो. ‘१० व्या शतकात आज जिकडे तो उभा आहे तिकडे तो आणला गेला’, असे इतिहास सांगतो. ‘या लोहस्तंभाच्या उभारणीत नक्की काय तंत्रज्ञान वापरले गेले असेल ?’ यावर अनेकांनी स्वतःची मते मांडलेली होती.

लोहस्तंभ

१. लोहस्तंभ न गंजण्यामागे भारतियांचे धातूविज्ञानाचे ज्ञान कारणीभूत

वर्ष २०२२ मध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात या लोहस्तंभाविषयी अनेक गोष्टी समोर आल्या. लोखंडाने बनवलेली कोणतीही गोष्ट वातावरणात असलेल्या आर्द्रतेशी संयोग करून आयर्न ऑक्साईड सिद्ध करते, ज्याला ‘गंज’ म्हणतात. वस्तू गंजल्यामुळे लोखंड खराब होऊन ती वस्तू नष्ट होते. वास्तविक तब्बल १ सहस्र ६०० वर्षे ऊन, वारा, पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता झेलत असलेल्या लोहस्तंभाचे लोखंड कधीच गंजून नष्ट होणे अपेक्षित होते; पण ते आजही गंजले जात नाही. यामागे भारतीय संस्कृती आणि भारतियांचे धातूविज्ञानाचे ज्ञान कारणीभूत असल्याचे सप्रमाण स्पष्ट झाले आहे.

२. लोहस्तंभाच्या आतील लोखंडापर्यंत आर्द्रता न जाण्यामागील कारण

लोहस्तंभ आर्द्रता किंवा पाण्याशी वेगळ्या पद्धतीने ‘रिॲक्ट’ (अभिक्रिया होणे) करतो. पाणी किंवा आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर लोहस्तंभातील लोखंड गंजण्याऐवजी ‘मिसाव्हाईट’ नावाचे एक वेगळे संयुग सिद्ध करते. जे आजवर कधी कुठे बघण्यात आलेले नाही. हे मिसाव्हाईट संयुग लोखंडावर उलट एक अवरोधक थर सिद्ध करते की, ज्यातून हवेतील आर्द्रता आतल्या लोखंडाशी संयोग करूच शकत नाही. हे संयुग इथवर थांबत नाही, तर लोखंडाच्या ‘मॅग्नेटिक प्रॉपर्टी’मध्ये (चुंबकीय गुणधर्मामध्ये) वाढ करते. जितकी अधिक आर्द्रता आणि पाणी याच्या संपर्कात येईल तितक्या अधिक प्रमाणात मिसाव्हाईट संयुग सिद्ध होते. तितका जाड थर लोहस्तंभाच्या संपूर्ण बाह्य पृष्ठभागावर जमा होतो. याचा सरळ अर्थ लोहस्तंभाच्या आतल्या लोखंडापर्यंत आर्द्रता शिरूच शकत नाही. त्यामुळे जितक्या अधिक आर्द्रतेत आणि प्रदूषणात हा लोहस्तंभ असेल, तितके अधिक थर त्याचे संरक्षण करणार.

३. लोखंड आणि फॉस्फरस वापरून लोहस्तंभाची केलेली रचना अन् भारतियांची महानता

लोहस्तंभात वापरण्यात आलेल्या धातूचे रासायनिक विघटन केले, तर त्यात ९८ टक्के लोखंड, १ टक्का फॉस्फरस आणि १ टक्का इतर विशेष मिश्रण आढळले आहे. या १ टक्का मिश्रणाला ‘वज्र संघठ’ असे नाव दिलेले आहे. हे कसे बनते, याची माहिती उपलब्ध आहे. ज्यात शिशाचे ८ भाग, ‘बेल मेटल’चे २ भाग आणि पितळेच्या ‘कालक्स’चे २ भाग मिसळून ते सिद्ध केले जाते. लोहस्तंभात असलेला फॉस्फरस, वज्र संघठ हवेतील आर्द्रतेशी संयोग करून लोखंड, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे एक संयुग सिद्ध करतात. ज्याचे रासायनिक सूत्र  (y-FeOOH) असे येते. यालाच ‘मिसाव्हाईट संयुग’ म्हणतात.

श्री. विनीत वर्तक

आजच्या काळात लोखंड सिद्ध करतांना त्यात फॉस्फोरस आधी काढून टाकले जाते; कारण फॉस्फोरस जर लोखंडात असेल, तर ते एकजीव होऊ शकत नाही. चांगल्या पद्धतीचे लोखंड सिद्ध होण्यासाठी त्यात फॉस्फोरस नसावे, असे आजचे तंत्रज्ञान सांगते; पण १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी भारतियांनी तर फॉस्फोरस वापरून लोहस्तंभाची रचना केली. नुसती रचना केली नाही, तर काळाच्या कसोटीवर ते लोखंड न गंजता टिकून राहू शकते, हे सप्रमाण सिद्ध केले.

याचा अर्थ असा होतो की, भारतियांना १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी फॉस्फरस काय करू शकतो, याचा अंदाज होता. याखेरीज फॉस्फरस असल्याने काय हानी होते, याचीही कल्पना होती; कारण ती होती म्हणून फॉस्फरस लोखंडात ठेवून ते त्याला एकजीव करण्याचे तंत्रज्ञान शोधू शकले. आताची रासायनिक सूत्र (y-FeOOH) किंवा मिसाव्हाईट संयुगांचा फॉर्म्युला त्यांच्याकडे १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी असणे शक्यच नाही, हेच आपल्या मनावर ठासवले गेले आहे; कारण ‘सगळे शोध पाश्चिमात्य देशांनी लावले. भारतात दगड-धोंडे होते’, असेच आम्हाला आमच्या संस्कृतीविषयी सांगितले गेले आहे. एकदा विचार करा की, आजचे तंत्रज्ञान जिकडे फॉस्फोरस लोखंडात ठेवायला घाबरते, तिकडे भारतीय लोकांनी फॉस्फोरस ठेवून एका अशा स्तंभाची रचना केली की, जी वर्ष २००२ उजाडेपर्यंत जगाला कळलीच नव्हती.

भारतीय कारागिरांनी फॉस्फरस बाहेर काढला नाही; पण लोखंड एकजीव करण्यासाठी त्याला चारही बाजूने गरम करून त्यावर घाव घातले. यामुळे लोखंडाचे आतल्या भागात एक प्रकारे वेल्डिंग झाले आणि राहिलेला फॉस्फरस पृष्ठभागावर ढकलला गेला. त्यामुळे आत एकजीव लोखंड, तर बाहेर फॉस्फरसचा एक स्तर सिद्ध झाला. याच तंत्रज्ञानामुळे फॉस्फरस हवेतील आर्द्रतेशी संयोग पावून लोखंडावर एक अभेद्य असे कवच सिद्ध करत राहिला. ज्यामुळे आज १ सहस्र ६०० वर्षांपेक्षा अधिक वर्ष उलटूनही लोहस्तंभाला गंज चढलेला नाही.

४. अद्वितीय भारतीय तंत्रज्ञान

आज देहलीतील कुतूबमिनार आम्हाला सांगितला आणि शिकवला जातो; पण तेथील लोहस्तंभात वापरलेल्या तंत्रज्ञानावर मात्र कुणीच काही बोलत नाही. भारताचे धातू ज्ञान न पचणारे आणि ‘हा एक अपघात होता’, असे बोलून मोकळे होतात; कारण ‘असे तंत्रज्ञान दुसरीकडे का वापरले गेले नाही ?’, या प्रश्नाचा आडोसा घेतात; पण विचार करा की, विष्णु मंदिराच्या समोर उभा रहाणारा हा स्तंभ उभारतांना १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी काय तंत्रज्ञान वापरले गेले असेल ? आज देहलीत मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या लोहस्तंभाला जेव्हा कधी भेट द्याल, तेव्हा त्या १ सहस्र ६०० वर्षांपूर्वीच्या कारागिरांना अभिवादन करायला विसरू नका; कारण त्यांच्या नंतर अशी कलाकृती उभी करणे न कुणाला जमले नाही, ना आज कुणी करू शकते.

– श्री. विनीत वर्तक, अभियंता, मुंबई (डिसेंबर २०२२)

(साभार : विनीत वर्तक यांचा ‘ब्लॉगस्पॉट’)