नाशिक येथे राज्यस्तरीय ज्योतिष आणि वास्तू अधिवेशन पार पडले !
नाशिक – येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ज्योतिष आणि वास्तू अधिवेशनामध्ये कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणार्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. प्रीतम नाचणकर यांनाही ‘विशेष पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सनातनचे साधक श्री. कौस्तुभ क्षत्रीय यांनी श्री. प्रीतम नाचणकर यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय ज्योतिष आणि वास्तू अधिवेशन येथे पार पडले. हे अधिवेशन ‘आयादी ज्योतिष वास्तू, नाशिक’ आणि ‘महिला ज्योतिर्विद संस्था, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. त्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या वेळी आयोजकांनी सांगितले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात पत्रकारितेची दयनीय स्थिती झाली आहे. विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट समाज आणि विशिष्ट विचारधारा यांचेच लांगूलचालन करण्यात पत्रकार धन्यता मानतात; पण काही मोजकेच पत्रकार राष्ट्रहितासाठी वार्तांकन करतात. या सर्व पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे; म्हणून आम्ही या सर्व पत्रकारांचा सन्मान केला.’’
सर्वश्री संजय पाठक, फणींद्र मंडलिक, अनिल दीक्षित, अरुण मालानी, अजय भोसले, प्रीतम नाचणकर, ज्ञानेश्वर काळे, मनीष कटारिया, भागवत उदावंत सर, नरेंद्र जोशी, अभिजीत कुलकर्णी, मुकुल कुलकर्णी, चंदन पुजाधिकारी या सर्व पत्रकारांना या वेळी सन्मानित करण्यात आले.
अधिवेशनात कालनिर्णय, वास्तुशास्त्र आणि वर्ष २०२३ मधील घडामोडी या विषयांवर व्याख्याने झाली. या अधिवेशनाला डॉ. (सौ.) ज्योती जोशी, डॉ. नरेन उमरीकर, डॉ. प्रसन्न मुळे, शेवाळे, प्रिया मालवणकर, मा. मारटकर सर उपस्थित होते. डॉ. (सौ.) ज्योती जोशी यांनी ज्योतिषशास्त्राविषयी माहिती दिली आणि डॉ. नरेन उमरीकर यांनी ‘वास्तुशास्त्र’ या विषयावर व्याख्यान दिले. मा. मारटकर सरांनी वर्ष २०२३ मधील विशेष घडामोडींवर व्याख्यान दिले.
आयोजकांकडून ‘सनातन प्रभात’विषयी गौरवोद्गार !‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले. |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला मिळालेला पुरस्कार हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा गौरव ! – प्रीतम नाचणकर
‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाने कार्यरत आहे. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला मिळालेला पुरस्कार हा खर्या अर्थाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा गौरवच आहे. या ध्येयासाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या संपादकीय विभागापासून ते घरोघरी वितरण करणारे वितरक, तसेच आत्मीयतेने वाचन करणारा ‘सनातन प्रभात’चा हिंदुत्वनिष्ठ वाचकवर्ग या सर्वांचा हा सत्कार आहे, असे मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो. दैनिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी मी हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो. आयोजकांनी पुरस्कार देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा गौरव केला, त्यांच्याविषयी मी कृतज्ञ आहे.