मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीतल गोगटे यांना जाणवलेले आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व !

‘७.१२.२०२२ (मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्तजयंती)) या दिवशी माझी मोठी बहीण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साजरा झाला. तेव्हा सनातनचे तीनही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ), तसेच श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सौ. शीतल गोगटे

१. वाढदिवसाच्या कक्षातील आनंदी आणि चैतन्यमय झालेले वातावरण !

श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) तिथे उपस्थित प्रत्येकाला सौ. अंजलीताईंची (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) गुणवैशिष्ट्ये सांगण्यासाठी पुढे बोलावत होते. श्री. विनायकदादा बोलावतील, तसे एकेक जण पुढे येऊन सौ. अंजलीताईंविषयी सांगून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते. त्या वेळी तेथील वातावरण पुष्कळ आनंदी आणि चैतन्यमय झाले होते.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी बोलू लागल्यावर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण

श्री. विनायकदादांनी माझे नाव पुकारल्यावर मी सौ. अंजलीताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उठले. मी बोलायला आरंभ केल्यावर अकस्मात् माझ्या कानात कुणीतरी सांगितले, ‘‘तू पुढे काही बोलायचे किंवा सांगायचे नाहीस.’’ हे शब्द ऐकून मी पुष्कळ घाबरले आणि एकदम स्तब्ध झाले. मला काही बोलता येईना. मी केवळ १ – २ शब्द बोलून माझ्या आसंदीवर येऊन बसले. खरेतर, मला पुष्कळ काही सांगायचे होते; पण मला काही सांगता आले नाही.

३. ‘सनातनचे तीनही गुरु उपस्थित असतांना तिथे मोठ्या क्षमतेच्या वाईट शक्तींचा प्रभावही तेवढाच असतो’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे

मला तिथे काहीच बोलता आले नाही; म्हणून मी सौ. अंजलीताईंना याचे कारण विचारले. तेव्हा आमच्यामध्ये पुढील संवाद झाला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीताई : तुझ्यावर फार मोठे आक्रमण झाले होते. त्यामुळे तुझा चेहराही पुष्कळ वेगळा दिसत होता.

मी (सौ. शीतल) : एवढ्या चैतन्यमय वातावरणात आक्रमण कसे काय झाले ?

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीताई : आम्ही तीनही गुरु उपस्थित असतांना वाईट शक्तींचा प्रभावही तेवढाच असतो.

४. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व जाणवणे

या प्रसंगानंतर माझ्या लक्षात आले की, ‘त्या दिवशी माझे नामजपादी उपाय झाले नव्हते आणि त्यामुळेच माझ्यावर आक्रमण झाले.’ यातून आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

हे गुरुदेवा, मी यापुढे नियमितपणे नामजपादी उपाय करीन.’

– सौ. शीतल गोगटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४५ वर्षे), मिरज.(७.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.