धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

दादर (मुंबई) येथील हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सहस्रावधी हिंदूंचा सहभाग !

मार्गदर्शन करतांना आमदार टी. राजासिंह

मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालवयात गोहत्या करणार्‍या कसायाचा हात कापला. महाराष्ट्राला पुन्हा हिंदुभूमी करण्यासाठी हिंदूंनी कंबर कसायला हवी. जोपर्यंत धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोहत्या बंदी कायदे होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसू नका. धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील, असे आवाहन आमदार टी. राजासिंह यांनी मुंबईतील हिंदु जनआक्रोश मोर्च्यामध्ये केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी शिवाजी पार्क ते कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये सहस्रावधींच्या संख्येने धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.

या वेळी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘केवळ श्रद्धा वालकर नव्हे, तर सहस्रावधी युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत. याला उत्तर देण्यासाठी हिंदु महिलांनी शक्तीचे रूप धारण करणे आवश्यक आहे. झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास वाचणे आवश्यक आहे. ‘देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी किती संघर्ष केला’, हे समजून घेणे आवश्यक आहे. हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत हिंदु महिलांनी जिजामाता होण्याची आवश्यकता आहे. मोगलांचे राज्य असतांना जिजामातेने हिंदवी राज्य स्थापन करणारा पुत्र घडवण्याचा संकल्प केला. सद्यःस्थितीत हिंदु महिलांना ‘स्वत:चा मुलगा आधुनिक वैद्य किंवा अभियंता व्हावा’, असे वाटते; परंतु आजची स्थिती पहाता घराघरांतून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची आवश्यकता आहे.’’

मोर्च्यात सहभागी सहस्रावधी हिंदू
मोर्च्यानंतर व्यासपिठासमोर जमलेले सहस्रावधी धर्मप्रेमी हिंदू

आमदार टी. राजासिंह यांच्या भाषणातील जाज्वल्यपूर्ण विचार !

‘लव्ह जिहाद’ हे सिमीचे षड्यंत्र !

बंदी घालण्यात आलेल्या ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेने लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू केलेे. ‘सरकार बंदी आणणार’, हे कळताच तिने ‘लव्ह जिहाद’ या नावाने संघटना कार्यरत केली. हिंदु मुलींना बाटवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. लव्ह जिहादसाठी विदेशातून पैसे येतात.

भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल !

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

हलाल प्रमाणपत्र घ्यायला हा इस्लामी देश नाही !

हिंदूंनो, १ रुपयाची किंवा १ लाख रुपयांची खरेदी असो, प्रत्येक वस्तू हिंदूंकडूनच खरेदी करा. ज्या वस्तूंवर हलालचा शिक्का असेल, त्या खरेदी करू नका. मॉलमध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) गेल्यास हिंदी, उर्दू किंवा मराठी या भाषांमध्ये ‘हलाल’ असे लिहिलेले नाही ना, याची निश्‍चिती करा. योगऋषी रामदेवबाबा यांना माझे निवेदन आहे की, त्यांनी त्यांच्या उत्पादनांवरील हलाल शिक्का काढावा, अन्यथा हिंदू त्यांचे उत्पादन खरेदी करणार नाहीत. हलाल प्रमाणपत्र घ्यायला भारत हा इस्लामी देश नाही.

अनधिकृत मशिदी हटवणार्‍या सरकारला आमचा पाठिंबा राहील !

मुंबईमध्ये मुसलमानांची वस्ती वाढत आहे. जेथे हिंदूंची संख्या अल्प आहे, तेथे त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात आहे. यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी अनधिकृत मशिदी बांधण्यात आल्या आहेत. अनधिकृत मशिदी हटवणार्‍या सरकारला आमचा पाठिंबा राहील.

धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलीदानदिन ‘धर्मवीरदिन’ घोषित करा !

काही नतद्रष्ट लोक ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले नाहीत’, असे म्हणतात. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचला असता, तर त्यांनी असे म्हटले नसते. आज जे खासदार, आमदार आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज अन् धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच आहेत. हिंदुद्वेषामुळेच औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज यांची हत्या केली. त्यामुळे त्यांचा बलीदानदिन ‘धर्मवीरदिन’ म्हणून सरकारने घोषित करावा.

लव्ह जिहाद देशातून हद्दपार होईपर्यंत आमचा संघर्ष चालू राहिल ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सौ. नयना भगत

हिंदूंनो, मागील ७५ वर्षांमध्ये हिंदूंना शेळ्या-मेढ्यांप्रमाणे वागवले जात आहे. आता हा बुरखा फाडून संपूर्ण हिंदु समाज वाघाची डरकाळी फोडत आहे. सरकारने जागृत होऊन लव्ह जिहादविरोधी कायदा करावा. केवळ मुंबईतूनच नव्हे, तर लव्ह जिहाद भारतातून हद्दपार होईपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील, अशी प्रतिक्रिया मोर्च्यामध्ये सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी व्यक्त केली. सनातन संस्थेचे साधकही मोर्च्यात सहभागी झाले होते.

या मोर्च्यामध्ये भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लवेकर, आमदार तमिळ सेल्वन, आमदार सुनील राणे, खासदार मनोज कोटक आदी सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर, मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांसह समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल या सर्वांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. विविध हिंदुत्वनिष्ठ स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.