राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित वृत्तांचे रविवारचे विशेष सदर : २९.१.२०२३

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत . . .

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही ! – ‘माहिती अधिकारा’त मिळाली माहिती

‘इस्लामी आतंकवाद’ असल्याचे माहितीतून झाले स्पष्ट !

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही, अशी माहिती ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी मिळवली आहे. ‘काही राजकीय नेत्यांनी लांगूलचालनाच्या राजकारणासाठी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द निर्माण केला’, असा आरोप प्रफुल्ल शारदा यांनी केला.

प्रफुल्ल शारदा यांनी केलेल्या माहितीच्या अर्जामध्ये विचारले होते की, भारतात किती आतंकवादी संघटना आहेत ? त्यांची नावे आणि विस्तृत माहिती देण्यात यावी. तसेच त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत ? आणि हिंदु आतंकवादी किंवा भगवा आतंकवाद असा शब्द असेल, तर त्याचीही माहिती देण्यात यावी. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये आतंकवादी संघटनांची नावे आणि विस्तृत माहिती देण्यासह ‘भगवा’ किंवा ‘हिंदु’ आतंकवाद’ असा कोणताच शब्द त्यांच्याकडे नोंद नसल्याचे सांगितले. (१६.१.२०२३)


(म्हणे) ‘श्रीराम मद्यपान करत होते, त्यांना आदर्श कसे म्हणावे ?’

हिंदुद्रोही लेखक के.एस्. भगवान यांचे हिंदुद्वेषी विधान !

के.एस्. भगवान

‘‘श्रीराम दुपारी सीतेसमवेत बसत. दिवसभर मद्यपान करत. सीतेला वनवासात पाठवत. त्यांना सीतेची कोणतीही काळजी नव्हती. झाडाखाली बसून प्रायश्चित्त घेणार्‍या शांबूक याचा त्यांनी शिरच्छेद केला. मग त्यांना आदर्श कसे म्हणावे ?’, असे हिंदुद्वेषी विधान सेवानिवृत्त प्राध्यापक आणि हिंदुद्रोही लेखक के.एस्. भगवान यांनी केले. ते २०.१.२०२३ या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.’ (२३.१.२०२३)


मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये हिंदूंचे धर्मग्रंथ शिकवणार !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे शिकवली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे एका कार्यक्रमात घोषणा केली. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये मुलांना या पुस्तकांचेही शिक्षण दिले जाईल. (असा निर्णय केंद्र सरकारने संपूर्ण देशातील सरकारी आणि अनुदानित शांळांसाठी घेतला पाहिजे. – संपादक) (२५.१.२०२३)


गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील !

तापी जिल्हा सत्र न्यायालय

तापी (गुजरात) – गायीतून धर्माचा जन्म झाला असून गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील, असे मत तापी जिल्हा सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गायींची तस्करी करणार्‍या महंमद आमीन आरिफ अंजुम या २२ वर्षीय गोतस्कराला जन्मठेपेची शिक्षा सुनावतांना न्यायालयाने हे मत नोंदवले. जुलै २०२० मध्ये महाराष्ट्रातून एका ट्रकमधून १६ गायी आणि गोवंशीय घेऊन जात असतांना त्याला अटक करण्यात आली होती. (२४.१.२०२३)


बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !

बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्या. वसंत पंचमीला होणार्‍या श्री सरस्वतीदेवीच्या पूजेला विरोध करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे. (बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे ! – संपादक) (२६.१.२०२३)