जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावरील आतंकवादी आक्रमण ८ जण ठार, तर १० जण घायाळ  

घटनास्थळ

जेरुसलेम (इस्रायल) – येथील नेवे याकोव्हमधील प्रार्थनास्थळामध्ये करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणात ८ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. आक्रमण करणार्‍या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. आक्रमणाच्या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. २६ जानेवारी या दिवशी पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकवर इस्रायलने केलेल्या आक्रमणानंतर हे आक्रमण करण्यात आले. इस्रायलच्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण घायाळ झाले होते.

१. एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, हे आक्रमण २७ जानेवारीच्या रात्री ८.१५ वाजता करण्यात आले. २१ वर्षीय आतंकवादी अलकाम खायरी प्रार्थनास्थळाजवळ आला. तो प्रार्थना संपण्याची वाट पाहत होता. लोक बाहेर येताच त्याने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर तो चारचाकी गाडीतून पळून गेला. १५ मिनिटांनी पोलिसांनी त्याची गाडी थांबवली. त्यानंतर आतंकवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आतंकवादी ठार झाला.

२. इस्रायलच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या इतर पक्षांना सैन्याच्या साहाय्याने वेस्ट बँकमधून पॅलेस्टिनी वस्ती हटवायची आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढला आहे.