आज २८ जानेवारी या दिवशी ‘भीष्माष्टमी’ आहे. त्या निमित्ताने…
‘माघ शुक्ल अष्टमी या तिथीला उत्तरायणाची वाट पहात शरशय्येवर असलेले पितामह, कौरव-पांडव यांचे पालनकर्ते, अलौकिक योद्धे आणि दुर्योधनाचे सेनापती, मुत्सद्दी, भक्त, योगी आणि ज्ञानी अशा भीष्माचार्यांच्या कार्याची समाप्ती झाली.
महाभारताचे युद्ध समाप्त झाल्यानंतर राज्याभिषेक झाल्यावर युधिष्ठिर श्रीकृष्णाच्या भेटीस गेला. त्यानंतर पांडव आणि श्रीकृष्ण रथात बसून शरशय्येवर असलेल्या पितामह भीष्मांच्या जवळ गेले. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीष्मांनी राजधर्म, क्षत्रिय धर्म आणि नीती यांचा बोध युधिष्ठिरास केला. या बोधामृताचा उपदेश ५६ दिवस म्हणजे मरणकाळापर्यंत अखंड चालू होता. महाभारताच्या ‘शांती’ आणि ‘अनुशासन’ या दोन पर्वात तो उपदेश महर्षि व्यासांनी ग्रंथित केला आहे. त्यानंतर सूर्य उत्तर दिशेस वळल्यावर भीष्मांचा अंतकाल नजिक आला. सर्वांचा निरोप घेतल्यावर भीष्मांनी स्वतःचे नेत्र आणि मन श्रीकृष्णाकडे वळवले. श्रीकृष्णाने अनुज्ञा दिली, तेव्हा त्यांनी त्याचे ध्यान करत स्वतःचा प्राण योगबलाने ब्रह्मरंध्राकडे नेला आणि शेवटी मस्तकातून एक तेजोमय ज्योती बाहेर पडून आकाशाकडे निघून गेली. नंतर पितामह भीष्म यांचा आत्मा श्रीकृष्णामध्ये विलीन झाला.
भारतात पितामह भीष्मांसारखा सर्वगुणसंपन्न असा दुसरा पुरुष आढळत नाही. अलौकिक धैर्य, निष्पाप वर्तन, अचल कर्तव्यनिष्ठा, सत्य, प्रीती आदी अनेक गुण त्यांच्यात उठावाने दिसून येतात. या त्यांच्या गुणांना दुसरी तोड नाही. आपल्या अंतःकाळी भीष्मांनी जो उपदेश केला, तो भारतियांना आजही मोलाचा वाटणारा आहे. ‘सत्यनिष्ठा आणि धर्मप्रीती या योगेच सर्वांचे कल्याण आहे’, असे त्या उपदेशाचे सार होते.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))