सूर्यदेवाचे माहात्‍म्‍य !

आज २८ जानेवारी २०२३ या दिवशी ‘रथसप्‍तमी’ आहे. त्‍या निमित्ताने…

‘रथसप्‍तमी’ : या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते

माघ शुक्‍ल सप्‍तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्‍तमी’ म्‍हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्‍तीभावाने सूर्यपूजन होत असते. पृथ्‍वीवरील सर्व चराचर वस्‍तूंचे जीवन सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्‍याकारणाने प्राचीन लोक सूर्यास देव मानू लागले. ही सूर्याची उपासना फार प्राचीन काळापासून चालू आहे. ऋग्‍वेदामध्‍ये सूर्यदेवतेच्‍या अनेक प्रार्थना आहेत. ‘आकाश म्‍हणजे अदिति आणि त्‍याचा पुत्र सूर्य म्‍हणजे आदित्‍य, तो आम्‍हाला पापमुक्‍त करो’, अशा आशयाच्‍या प्रार्थना विविध ग्रंथांतून आढळतात. आपल्‍याकडे सूर्योदय आणि सूर्यास्‍त या वेळी सूर्याला अर्घ्‍य देण्‍याची प्रथा आहेच. उपनयनाच्‍या वेळी बटु हा सूर्याचाच विद्यार्थी मानला गेलेला आहे. इच्‍छित अन्‍न देणारी थाळी युधिष्‍ठिरास सूर्यापासून मिळाली होती. यावरून आर्यवर्तात सूर्य उपासनेची परंपरा पहिल्‍यापासून होती, हे लक्षात येते. मुल्‍तान (पाकिस्‍तान) येथील प्रसिद्ध सूर्यमंदिराचा १७ व्‍या शतकांत धर्मवेड्या औरंगजेबाने विध्‍वंस केला.

हिंदुस्‍थानात स्‍थानपरत्‍वे या तिथीला निरनिराळी नावे प्राप्‍त झाली आहेत. हा मन्‍वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्‍या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))