‘गडाची स्‍वच्‍छता हीच विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव ठेवून गडाच्‍या स्‍वच्‍छतेतील आनंद अनुभवणारी फोंडा (गोवा) येथील कु. अवनी छत्रे !

कु. अवनी छत्रे

१. फर्मागुडी येथील गडाची स्‍वच्‍छता करतांना ‘हा उपक्रम दास्‍यभावाने पार पाडला पाहिजे’, असा विचार मनात येणे : ‘३०.११.२०२२ या दिवशी मी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या फर्मागुडी (गोवा) येथील गडाची स्‍वच्‍छता करणे’, या उपक्रमात सहभागी झाले होते. तेव्‍हा ‘गडाची स्‍वच्‍छता करणे’, ही समाजसेवा नसून ती विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव माझ्‍या मनात होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केले, तसेच आपल्‍याला हिंदु राष्‍ट्र आणायचे आहे. त्‍यासाठी आपल्‍यामध्‍ये वीरता आणि ब्राह्मतेज यांच्‍यासह भक्‍ती असायला हवी. त्‍यामुळे ‘हा उपक्रम दास्‍यभावाने पार पाडला पाहिजे’, असा विचार माझ्‍या मनात आला.

२. गडाच्‍या स्‍वच्‍छतेनंतर गरुड पक्षी दिसल्‍यावर ‘साक्षात् श्रीमन्‍नारायण प्रसन्‍न होऊन सर्व धर्मप्रेमींना आशीर्वाद देण्‍यासाठी आला आहे’, असे वाटून पुष्‍कळ आनंद होणे : मी नामजप करत गडाची स्‍वच्‍छता करण्‍यातील आनंद घेतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अनुभवण्‍याचा प्रयत्न करत होते. स्‍वच्‍छता पूर्ण झाल्‍यावर आम्‍ही तेथील सगळा कचरा पिशव्‍यांमध्‍ये भरला. तेव्‍हा आम्‍हाला तिथे गरुड पक्षी दिसला. गरुडाला पाहून ‘साक्षात् श्रीमन्‍नारायण प्रसन्‍न होऊन आम्‍हा सर्व धर्मप्रेमींना आशीर्वाद देण्‍यासाठी गरुडावर आरूढ होऊन आला आहे’, असे मला वाटले. या अनुभूतीमुळे दुपारच्‍या वेळी स्‍वच्‍छता केल्‍याने आलेला थकवा नाहीसा होऊन आम्‍हा सर्वांनाच पुष्‍कळ आनंद मिळाला.

या अनुभूतीतून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला ‘हिंदु राष्‍ट्राची सेवा हीच ईश्‍वरसेवा आहे’, हे शिकवले. त्‍यासाठी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते, तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याप्रमाणे आम्‍हालाही हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या कार्यात वाहून घेता येऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना करते.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक