वर्धा – महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल पहाता धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ तुष्टीकरणाचा खेळ खेळत हिंदूंच्या भावना आणि त्यांची जीवनमूल्ये यांची चेष्टा करणार्या तथाकथित राजकारण्यांना संपूर्ण समाजाने दिलेला धडा हा सावरकरी हिंदुत्वाचा विजय आहे. राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पित करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करू शकत नाही, हेच या निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्र जनतेने दाखवून दिले आहे, असे विधान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’चे जिल्हाध्यक्ष आणि वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे निर्माते प्रा. श्याम देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचे भाष्यकार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हे राष्ट्र्रवादी हिंदुत्व आहे. सावरकर यांचे जात, पात, पंथ, संप्रदाय, उपासना, सण समारंभ, भाषा आदी घटकांच्या वर उठून केवळ राष्ट्राचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यांचा विचार करणारे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व असल्यामुळे ते संविधानिक हिंदुत्व ठरते. त्याची आज नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन जनतेने हिंदुहिताचा विचार करणार्या नेत्यांच्या हाती बहुमताने सत्ता दिली. त्यामुळे या देशात हिंदू जागृत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’’
या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून येणार्या महायुतीच्या सर्व उमेदवारांसह वर्धा येथील नवनिर्वाचित आमदार डॉ. पंकज भोयर यांचे अभिनंदन केले.