नाशिकमध्ये गेल्या १० दिवसांत रागावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवीन नाशिक ‘सिडको’ भागात एका पित्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाचा विरोध म्हणून रागाच्या भरात पोटच्या मुलीचा गळा आवळला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सातपूर येथे सामाजिक माध्यमांवरील ‘पोस्ट’वर लिहिलेल्या संदेशाचा राग आल्याने झालेल्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. हे चालू असतांना नाशिक रोडला दुचाकी वाहनांना आग लावण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केला. कधी वडिलांनी ‘बाईक’ घेऊन दिली नाही; म्हणून तर कधी महागडा ‘मोबाईल’ दिला नाही; म्हणून आत्महत्येकडे प्रवृत्त होण्याच्या घटना घडत आहेत. त्यात पित्याने किंवा मुलाने टोकाचे पाऊल उचलत हिंसक कृत्य केले. सद्यःस्थितीला न्यून अधिक प्रमाणात सगळीकडे अशा घटना घडतांना दिसतात.
उपरोक्त घटनांची कारणमीमांसा लक्षात घेता राग अनावर झाल्याने केलेले कृत्य, भावना अनावर झाल्याने उचललेले टोकाचे पाऊल हेच दिसते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास यासंदर्भात पालक आणि पाल्य यांच्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल.
सद्यःस्थितीत बहुतेक मुलांना किंवा तरुणांना मिळालेला नकार पचवता येत नाही. मनासारखे न झाल्यास राग येतो. त्यांच्या वागण्याला एका अर्थी पालकही उत्तरदायी आहेत, असेच म्हणावे लागते. लहानपणापासून पाल्यांची योग्य हाताळणी केल्यास पुढे जाऊन मुलांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे सोपे जाते. कधी कधी पालकांनाही वाटते की, मुलांना काही कमी पडायला नको. ‘मला जे मिळाले नाही, ते माझ्या मुलांना मिळायला पाहिजे’, ही मानसिकता तारतम्याचा वापर करून न वापरल्यास मुलांवर अत्यंत घातक परिणाम करते.
यासाठी लहानपणापासूनच मुलांवर योग्य संस्कार करण्यावर भर देणे आवश्यक आहे. भावनांना आवर घालणे, मनाची स्थिरता, सहनशीलता, समजूतदारपणा, परिस्थिती स्वीकारणे आदी गुणांच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे, तसेच याला अध्यात्माची जोड दिल्यास मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. नियमित साधना करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच गुणवृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास षड्रिपूंवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.