पुणे – बहुचर्चित इशरत जहाँ चकमक प्रकरणावर मुंबईमध्ये रहाणारे लेखक अब्दुल शेख यांनी ‘इशरत जहाँ एन्काऊंटर’ हे पुस्तक लिहिले आहे. २४ जानेवारी या दिवशी गंज पेठेतील ‘सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहा’त या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते; मात्र दुरुस्तीचे कारण पुढे करून सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने अनुमती नाकारली. ‘महापालिकेने अनुमती नाकारली’, असे कारण सांगत पोलिसांनी रोखल्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रहित करावा लागला. लवकरच कार्यक्रमाचा पुढील दिनांक घोषित करण्यात येईल, असे आयोजक ‘मूलनिवासी मुस्लीम मंचा’चे अंजुम इनामदार यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
(सौजन्य : Saam TV)
कर्णावतीजवळ वर्ष २००४ मध्ये इशरत जहाँ नावाच्या तरुणीसह जावेद शेख, तसेच पाकिस्तानी नागरिक जिशान जौहर आणि अमजद अली राणा हे ‘लष्कर-ए-तोयबा’चे अन्य ३ जिहादी आतंकवादी अन् गुजरात पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत चौघा जिहाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. ‘ही चकमक बनावट असल्याचा दावा ‘इशरत जहाँ एन्काऊंटर’ या पुस्तकात करण्यात आला आहे. इशरत जहाँ हिला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे’, असे पुस्तकाचे लेखक शेख यांनी सांगितले. (न्यायालयाने या प्रकरणासंबंधी सुनावणी करतांना एक महत्त्वाचे सूत्र उपस्थित केले होते. ‘इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी होती’, हा गुप्तचर विभागाचा अहवाल फेटाळता येणार नाही. इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणतेही पुरावे नाहीत’, असे न्यायालयाने नमूद केले आहे. यातून ती आतंकवादीच असल्याचा एक प्रकारे निर्वाळा दिला होता. लष्कर-ए-तोयबाशी हातमिळवणी केलेल्या आतंकवादी हेडलीने वर्ष २०१६ मध्ये मुंबई न्यायालयासमोर ‘इशरत ही तोयबाची आतंकवादीच होती’, असे स्पष्ट केले होते. असे असतांना कोणत्या आधारावर पुस्तकाचे लेखक अब्दुल शेख हे इशरत जहाँ ही निष्पाप असल्याचा दावा करत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे ? – संपादक) न्या. बी.जी. कोळसे पाटील, माजी पोलीस महासंचालक श.मि. मुश्रीफ या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार होते.