भारतामध्ये क्रिकेट खेळाला डोक्यावर घेतले जाते. सध्या तसे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. याचे कारण सध्या देशात भारतीय संघाचे न्यूझीलंड संघाविरुद्ध एक दिवसांचे क्रिकेट सामने चालू असून कोट्यवधी भारतियांचे त्याकडे लक्ष आहे, तर हॉकीचे विश्वचषक सामने हेही भारतातच चालू असूनही बहुतांश भारतियांनी त्याकडे जणूकाही पाठ फिरवली आहे ! भारताची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली असून भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत सहज पोचेल, असे भारतीय खेळाडूंचा सध्याचा खेळ पहाता म्हणायला अडचण नाही; परंतु शोकांतिका ही आहे की, किती भारतियांना हॉकीचे विश्वचषक ओडिशामध्ये चालू असल्याचे ठाऊक आहे ? ‘देशात क्रीडा संस्कृती रुजणे आवश्यक आहे’, असे म्हटले जाते; परंतु ज्या खेळामध्ये भारताने रचलेला जागतिक विक्रम आजतागायत कोणताच देश मोडू शकलेला नाही आणि सध्याही भारत पुन्हा एकदा या खेळाला चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्नशील आहे, तिथे त्याला सर्व स्तरांवरून जणू वाळीत का टाकण्यात येत आहे ? हे दोन्ही प्रश्न ज्वलंत असून ही अतिशयोक्ती नाही. तथ्याधारित आकडे हॉकीची दुर्दशा दर्शवत आहेत. जर गूगलवर ‘क्रिकेट’ शब्द शोधला, तर त्याच्या चालू सामन्यांविषयी इत्थंभूत माहिती सहज मिळते, तर ‘हॉकी’ शोधशब्दासाठी विश्वचषकातील सामन्यांची माहितीसुद्धा सहज उपलब्ध होऊ नये ? मुळात केंद्र सरकारकडून या खेळाला किती प्रोत्साहन दिले जाते ? प्रसारमाध्यमेही हॉकीला विशेष महत्त्व न देण्यामागे ‘टी.आर्.पी.’चा त्यांचा हव्यास यास कारणीभूत आहे का ? ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’ आणि ‘भारतीय हॉकी फेडरेशन’ सुद्धा या खेळाच्या प्रचारार्थ सपशेल अपयशी ठरत आहेत का ? ‘टाटा स्टील’ने विश्वचषकाला प्रायोजक केले असले, तरी त्याला विशेष प्रसिद्धी का मिळतांना दिसत नाही ? त्यामुळे एकूणच भारतात हॉकीची ऐशी-तैशी झाली आहे, हे येथे खेदाने नमूद करावेसे वाटते.
क्रिकेटचे अजब भूत !
‘स्वत:ला सिद्ध केल्याखेरीज जग तुमच्याकडे लक्ष देत नाही’, अशी जागतिक रित आहे. भारतातील खेळाडूही त्यास अपवाद नसून खेळाडूंनी जागतिक व्यासपिठावर स्वत:चा वेगळेपणा सिद्ध केल्यासच सरकार आणि आस्थापने यांच्याकडून त्या खेळाला प्रोत्साहन दिले जाते. फुटबॉलचे उदाहरण घेतले, तर काही मासांपूर्वी ‘फिफा’ या फुटबॉलच्या जागतिक संघटनेने भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्री यांचा ‘कॅप्टन फँटास्टिक’ म्हणून गौरव केला होता. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकामुळे विजयी संघ असलेल्या अर्जेंटिनाचे लायोनेल मेस्सी आणि पोर्तुगाल संघाचे क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे नाव भारतात पुष्कळ चर्चिले जात आहे. त्या दोघांच्या खालोखाल सुनील छेत्री असून फिफाने त्यांचा गौरव केला. अर्थात् याविषयी किती भारतीय जाणतात ? एवढे झाल्यावरही भारतीय फुटबॉलला कितपत प्रोत्साहन मिळाले ? हा प्रश्न वादाचा विषय ठरू शकेल. वर्ष २०१३ मध्ये दोन भारतियांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात सचिन तेंडुलकर यांचे नाव सर्वांना स्पष्ट लक्षात असेल; परंतु दुसरे नाव होते महान वैज्ञानिक प्रा. सी.एन्.आर्. राव ! त्यांचे कर्तृत्व अभावानेच आम्हा भारतियांना ठाऊक असावे. त्यामुळे सुनील छेत्री यांचे उदाहरण असो किंवा प्रा. राव यांच्यासारख्या प्रतिभावान वैज्ञानिकाविषयी भारतीय अनभिज्ञ असण्याची गोष्ट असो, यास म्हणावे तरी काय ? आमच्याकडे विराट कोहली यांना ३ वर्षे एकही शतक करता आले नाही, याविषयी दु:ख व्यक्त केले जाते. गेल्या काही आठवड्यांत त्यांना अचानक सूर गवसला आणि एकाएकी ५ सामन्यांत ३ शतके केल्याने ते १०० शतकांच्या दिशेने गतीने वाटचाल करतील, असे असंख्य भारतीय तरुण स्वप्ने पाहू लागली ? क्रिकेटचे हे अजब भूत देशवासियांच्या मानगुटीवर कशा प्रकारे बसले आहे, हेच यांतून लक्षात येते.
भारतीय हॉकीची अवनती !
मूलत: हॉकीकडे भारताने पाठ का फिरवावी ? याचा वस्तूनिष्ठ ऊहापोह होणेही आवश्यक आहे. भारतियांमध्ये एक अपसमज आहे की, हॉकी हा आपला ‘राष्ट्रीय खेळ’ आहे. तसे नसल्याचे केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारलेल्या एका उत्तरातून स्पष्ट केले आहे. गेल्या शतकाच्या आरंभी ब्रिटनने ब्रिटीश इंडियामध्ये या खेळाला आणले. प्रारंभी गवताच्या मैदानात खेळल्या जाणार्या हॉकीमध्ये भारताने प्रचंड मोठी कामगिरी केली. ‘जादूगार’ म्हणून ख्याती मिळवलेले महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्यामुळे भारताला ३ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळाली. ७० च्या दशकात जेव्हा उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दादागिरीमुळे हॉकीचे सामने कृत्रिम गवताच्या (‘अॅस्ट्रो टर्फ’च्या) मैदानात खेळले जाऊ लागले, तेव्हा हा निर्णय भारताला मारक असूनही त्याने या निर्णयाला कोणताच विरोध केला नाही, हे आश्चर्यकारक होते. वर्ष १९८० च्या ‘ऑलिंपिक गोल्ड’नंतर भारत जागतिक स्तरावर मागे गेला. वर्ष २०२० च्या ऑलिंपिकमध्ये तब्बल ४० वर्षांनी भारताने या खेळात कांस्यपदक मिळवले. सध्या भारतीय संघ हा जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. एवढे असूनही त्यास म्हणावे तसे महत्त्व पुन्हा देण्यात आलेले दिसत नाही. एकीकडे ‘बायजूज्’, ‘ऑप्पो’, ‘स्टार इंडिया’ यांसारखी प्रथितयश आस्थापने क्रिकेट संघाला प्रायोजित करतात, तिथे ओडिशा सरकारच्या रूपात एका राज्य सरकारला हॉकी संघाला प्रायोजित का करावे लागते ? कॅनडाच्या हॉकी संघाला ‘नायके’ हे जगप्रसिद्ध आस्थापन २ दशकांहून अधिक काळ प्रायोजित करत आले आहे, तर भारतातील एकही आस्थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्या खेळाडूंना स्वत:चा ‘ब्रँड अॅम्बॅसेडर’ बनण्यासाठी किती आस्थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्या प्रोत्साहनार्थ संपूर्ण व्यवस्थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे सध्याच्या विश्वचषक स्पर्धेच्या सुमार प्रसिद्धीवरून लक्षात येते, हे मात्र खरे !
भारतीय हॉकीला सुगीचे दिवस येण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेकडून भगीरथ प्रयत्न होणे आवश्यक ! |