मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळावरून पिस्तुल आणि गोळ्या यांसह दोघांना अटक !

  • पोलिसांना चकवा देत सभास्थळी केला प्रवेश

  • खोट्या पदव्या सांगून पोलिसांच्या फसवणुकीचा प्रयत्न

नरेंद्र मोदी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे येथील बीकेसी मैदानात १९ जानेवारी या दिवशी सभा झाली. या वेळी पोलिसांनी सभास्थळावरून रामेश्‍वर मिश्रा आणि कटराम कावड या संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे मिळाली आहेत. कटराम कावड याच्याकडे पिस्तुलासह चार काडतुसेही सापडली आहेत.

१. सभास्थळी सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांना चकवा देत संशयित आरोपी रामेश्‍वर मिश्रा याने तो सैन्याच्या ‘गार्ड्स रेजिमेंट’मधील असल्याचे खोटे सांगितले आणि सभास्थळी अतीमहनीय व्यक्तींच्या जागेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्याला हटकले. तेव्हा त्याने स्वतः ‘एन्.एस्.जी.’च्या पठाणकोट स्थळामधील असल्याचे सांगितले.

२. यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याचे गळ्यातील ओळखपत्र बनावट असल्याचे समजले. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून वांद्रे न्यायालयाने आरोपीस २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

३. त्याच्या गळ्यात एलिट राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एन्.एस्.जी.ची) ओळखपत्र होते. त्यावर त्याला ‘रेंजर’ म्हणून तैनात केल्याचे लिहिले होते, तर ओळखपत्राच्या रिबिनवर ‘दिल्ली पोलीस सुरक्षा (प्रधानमंत्री)’ असे लिहिलेले होते.

४. अटक केलेला दुसरा आरोपी कटराम कावड हा भिवंडीतील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ‘स्मिथ अँड वॅगन स्प्रिगफिल्ड’ पिस्तुलासह ४ काडतुसे  सापडली. त्याच्याही विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे नव्हे, तर काय आहे ?