भारतीय कुस्तीपटूंचे देहलीतील आंदोलन मागे

चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाचेे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह पदावरून पायउतार !

वर्तुळात मध्यभागी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह

नवी देहली – भारतीय कुस्तीपटूंचे गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेले जंतरमंतरवरील आंदोलन २० जानेवारीच्या मध्यरात्री मागे घेण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी ही घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. सिंह यांनी आणि काही प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामध्ये भारतासाठी ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणार्‍या काही कुस्तीपटूंचाही समावेश आहे. काही खेळाडूंनी त्यांना स्वतःला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचाही आरोप केला आहे. आंदोलकांनी केलेले आरोप कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी फेटाळून लावले आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचे आश्‍वासन दिले. येत्या ४ आठवड्यांत ही समिती चौकशी पूर्ण करेल आणि त्याचा अहवाल सादर करेल. समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना पदापासून दूर रहातील.